Headlines

अंजनगाव सुर्जी शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा:संतप्त ग्राहकांचा गॅस एजन्सीवर गोंधळ‎




शहरातील देशमुख गॅस एजन्सीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने सोमवार २० रोजी ग्राहकांच्या संयमाचा बांध सुटला. गॅस मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेकडो ग्राहकांनी एजन्सीवर गर्दी करत गोंधळ घातला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता खा. बळवंत वानखडे यांनी तातडीने एजन्सीला भेट देऊन ग्राहकांशी संवाद साधला आणि या समस्येवर प्रभावी तोडगा काढला. देशमुख गॅस एजन्सीमध्ये सिलिंडरचा साठा मर्यादित असल्याने अनेक दिवसांपासून नागरिक चकरा मारत होते. वारंवार विनंती करूनही गॅस मिळत नसल्याने सोमवारी सकाळी ग्राहकांनी आक्रमक पवित्रा घेतला. संतापलेल्या नागरिकांनी एजन्सीला जाब विचारण्यास सुरुवात केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सुनील गावंडे (सभापती, कृ.उ.बा.स. दर्यापूर), प्रदीप देशमुख (शहर अध्यक्ष, काँग्रेस कमिटी अंजनगाव सुर्जी), विकास येवले (संचालक, कृ.उ.बा.स. अंजनगाव सुर्जी), सुयोग खाडे (नगरसेवक, न.प. अंजनगाव सुर्जी), कैलाश सिरसाठ यांच्यासह अंजनगाव सुर्जी शहर व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदारांची मध्यस्थी, आक्रमक भूमिका या घटनेची माहिती मिळताच खा. बळवंत वानखडे यांनी थेट गॅस एजन्सी गाठली. यावेळी त्यांनी रांगेत उभ्या असलेल्या महिला आणि पुरुषांच्या व्यथा ऐकून घेतल्या. ग्राहकांचा रोष रास्त असल्याचे पाहून खासदारांनी घटनास्थळावरूनच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. सामान्य नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहूनही हक्काचा गॅस मिळत नसेल, तर हे प्रशासन आणि कंपनीचे अपयश आहे. अंजनगाव सुर्जी शहरातील गॅस पुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करा, अशा कडक शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना ताकीद दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *