Headlines

ऑनलाइन क्रिकेट सट्ट्यावर धाड; यवतमाळ-पुणे कनेक्शन:अमरावतीत तिघे ताब्यात; 5.60 लाखांचा मुद्देमाल जप्त‎




शहराला लागून असलेल्या राजुरा येथे एका घरात सुरु असलेल्या ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर आज, सोमवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड घातली. या धाडीत चालक-मालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाइल, लॅपटॉप, रजिस्टर व इतर साहित्य असा ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदर घटनास्थळ हे फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत आहे. राजुरा येथील एका घरामध्ये महेश सुरेश पाटकर हा काही जणांसह आयपीएलमधील गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या संघात सुरू असलेल्या सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळाली होती. त्याआधारे गुन्हे शाखेच्या पथकान धाड टाकली. यावेळी तेथे तीन जण मोबाइल व लॅपटॉपचा वापर करून सदर सामन्यावर खायवाडी व लगवाडी (सट्ट्याची घेवाण-देवाण) करीत होते. या घटनेचे कनेक्शन यवतमाळ, पुण्यासोबतही जुळले आहे. प्रारंभी मोबाइल ॲपद्वारे व्यवहार करून नंतर तो रजिस्टरवर उतरवून हारजीतचा खेळ सुरु होता. पोलिसांनी माहिती विचारली असता संबंधितांनी त्यांची ओळख महेश सुरेश पाटकर (३४, रा. अंबा कॉलनी, अमरावती), अभिजीत अरुण पेटकर (३६, रा. आमनेर, वरूड) व सागर रामकृष्ण निंबर्ते (३०, रा. सावता मैदान, बडनेरा) अशी दिली. त्यांच्याजवळील लॅपटॉप व मोबाइलची तपासणी केल्यावर त्यात सट्ट्याचा व्यवहार तसेच खायवाडी व लगवाडीबाबतच्या रेकॉर्डिंग दिसून आल्या. बेकायदेशीरपणे बनविलेले बेटिंग ॲपसुद्धा आढळून आले. आरोपींकडून ९ मोबाइल, २ लॅपटॉप, रजिस्टर व अन्य साहित्य असा ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुने, दीपक सुंदरकर, सुनील लासुरकर, जहीर शेख, सचिन बहाळे, अतुल संभे, सूरज चव्हाण, राजीक रायलीवाले, योगेश पवार यांनी केली. क्रिकेट सट्ट्याची उतारी यवतमाळात, पुण्यातही क्रिकेट सट्ट्यासाठीची आयडी कोणाची, याबाबत पोलिसांनी शोध घेतला असता आरोपींनी सदरची आयडी ही रितेश जोशी (रा. यवतमाळ) याच्याकडून घेतल्याचे व क्रिकेट सट्ट्याची उतारी ही पुणे येथील गणेश उर्फ परेश मोहन भूत उर्फ अग्रवाल यांना देत असल्याचे चौकशीत समोर आले. त्यानुसार रितेश जोशी व गणेश उर्फ परेश मोहन भूत या दोघांचा शोध सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *