Headlines

धोकादायक पाण्याची टाकी पाडताना कामगार जखमी:पुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराला अग्निशामक दलाने वाचवले, ससूनमध्ये दाखल.




पुणे शहरातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात 50 फूट उंच पाण्याची धोकादायक टाकी पाडताना एक कामगार जखमी झाला. बुधवारी पहाटे ही घटना घडली. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या या कामगाराला अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परतेने वाचवले. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील ही पाण्याची टाकी धोकादायक झाली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही टाकी पाडण्याचे काम सुरू केले होते. दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने अग्निशामक दलाचे अधिकारी आणि जवान तिथे तैनात करण्यात आले होते. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास टाकी पाडण्याचे काम सुरू असताना तिचा काही भाग कोसळला. ढिगाऱ्याखाली एक कामगार अडकला आणि गंभीर जखमी झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. जवानांनी कामगाराला धीर देऊन त्याच्याशी संवाद साधला. बोल्डर कटर, स्प्रेडर, टिकाव, फावडे आणि दोरी यांसारख्या साहित्याचा वापर करून जवानांनी तासाभरात कामगाराला ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्याला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाचे अधिकारी नीलेश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, बी जी वैद्यकीय महाविद्यालय वसतीगृह येथील धोकादायक पाण्याची उंच टाकी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत पाडताना कोसळल्याने एक कामगार अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत सदर जखमीस जिवंत बाहेर काढण्यात यश मिळवले असून जखमीस उपचाराकरिता 108 शासकीय रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले आहे जवानांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक स्थानिकांकडून करण्यात आले. या बचावकार्यात नीलेश महाजन, राजू ओव्हाळ, अमित कसबे, भाऊसाहेब चोरमले, विजंय पिंजण, जयेश गाताडे, अल्पेश कोंडे, नवनाथ जेडगे, मारुती देवकुळे, विशाल गायकवाड, आतिश ओव्हाळ, प्रताप सांगळे, सुरेश पवार, प्रतीक कुंभार, विजय वाघमारे, मयूर चव्हाण आणि दत्ता खांडरे या जवानांचा समावेश होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *