![]()
पुणे येथे साउंड, डीजे, लाईट, मंडप आणि इव्हेंट संबंधित व्यवसायांवर होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पुणे जिल्हा साउंड, लाईट अँड जनरेटर ओनर्स असोसिएशनने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुणे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी व्यावसायिकांनी त्यांच्यावरील अन्यायकारक कारवाई थांबवण्याची, जप्त केलेली साउंड साधने तातडीने परत करण्याची आणि व्यवसायासाठी स्पष्ट व समान नियमावली लागू करण्याची मागणी केली. असोसिएशनचे अध्यक्ष गणेश काळभोर, उपाध्यक्ष सागर सुतार, सचिव राजू सोनावणे, खजिनदार मनोज भोसले आणि रिपब्लिकन परिवर्तन पँथरचे संस्थापक गजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वात हजारो व्यावसायिक या मोर्चात सहभागी झाले होते. साउंड व्यावसायिकांनी कायद्याचे पालन करून व्यवसाय करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, नियम आणि अटी पाळूनही त्यांच्यावर कारवाई होत आहे. साउंड सिस्टिम आणि इतर साहित्य जप्त करण्याच्या पद्धतीमुळे व्यावसायिक तसेच त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट आले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष गणेश काळभोर यांनी सांगितले की, “साउंड व्यावसायिकांना कायद्याच्या चौकटीत व्यवसाय करण्याची संधी द्यावी, जप्त केलेली साधने नियमानुसार तातडीने परत करावीत आणि अन्यायकारक कारवाई थांबवावी, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत.” त्यांनी विद्यानंद बापट यांच्यावरही टीका केली. “बापट हे काही उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय नाहीत. त्यांनी माध्यमांमधून उत्सवाचे वातावरण बिघडवले, हे चुकीचे आहे. त्यांना काही विधायक करायचे होते, तर न्यायालयात जायला हवे होते,” असे काळभोर म्हणाले. साउंड व्यावसायिकांच्या अडचणींवर शासन आणि प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. ढोलताशा पथक, बँड पथक, हलगी पथक, सनई-चौघडे आणि तुतारी यांना डेसिबलच्या नियमांमध्ये सूट दिली जाते, तशीच सूट आम्हालाही मिळावी, असे व्यावसायिकांनी म्हटले. सागर सुतार यांनी मागणी केली की, “कारवाई करायची असेल, तर सर्वांना समान न्याय द्यावा. एखाद्या व्यवसायावर बंदी किंवा जप्ती आणून आमच्यावर बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ आणू नये.” त्यांनी इशारा दिला की, ध्वनी प्रदूषणाच्या नियमांमुळे साऊंड सिस्टिम व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि प्रशासनाने परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलन केले जाईल. अनेक व्यावसायिकांनी कर्ज काढून, दागिने आणि जमिनी गहाण ठेवून हा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, ऐन उत्सवाच्या काळात बंदी घातल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कर्जाचे हप्ते कसे भरायचे आणि कुटुंब कसे चालवायचे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. “दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतात किंवा रस्ते अपघातात माणसे दगावतात, म्हणून दारू किंवा गाड्यांवर बंदी घातली जाते का? मग केवळ साउंड सिस्टिमवरच बंदी कशासाठी?” असा सवाल व्यावसायिकांनी उपस्थित केला.
Source link
साउंड व्यावसायिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा:कारवाई थांबवा, जप्त केलेली साधने परत करा आणि समान नियमावली लागू करा अशी मागणी