![]()
आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. मात्र, ‘हैदराबाद’ आणि मराठवाड्याला एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळाले. हैदराबाद संस्थानात 13 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारचे सैन्य घुसले. त्यांनी पोलिस ॲक्शन राबवले आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे वैशिष्ट्य म्हणजे या लढ्याचे नेतृत्व कधीही धर्माच्या आहारी गेले नाही. हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थांनी केले. त्यांना महात्मा गांधी मार्गदर्शन गांधीजी करत होते. त्यामुळे हा लढा अहिंसक होता. निजामाची धर्मांधता अन् रझाकारांच्या क्रूरतेला या लढ्याचे शेवटचे शिलेदार स्वातंत्र्यसैनिक अनंतराव भालेरावांनी दिलेला सेक्युलर लढाही इतिहासाच्या पानात अमर झालाय. खून, बलात्कार, लूटमार हैदराबाद हे भारतातले क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकाचे संस्थान होते. इथला राजा मुस्लीम आणि 80 टक्के प्रजा हिंदू होती. निजामासह काही मुस्लीम नेत्यांना स्वतंत्र राहायची अथवा पाकिस्तानात जायची खुमखुमी होती. याचसाठी रझाकार संघटनेला हाताशी धरून इथल्या प्रजेवर प्रचंड अत्याचार झाले. हैदराबादचा राजा आणि जुलूम करणारे पुष्कळसे अधिकारी मुस्लीम असले तरी त्यांच्याविरोधात हा लढा नव्हता. खून, बलात्कार, लूटमार सर्रास सुरू झालेली. बीड जिल्ह्यातल्या लघुरीमध्ये समाजविज्ञान कोषाचे कर्ते स. मा. गर्गे. यांचे घर रझाकारांनी उद्धवस्त केले. हे सर्वत्र सुरू होते. त्याचमुळे काँग्रेसने सशस्त्र चळवळ करावी यासाठी अहिंसेचे पुजारी महात्मा गांधींनी परवानगी दिली आणि अखेर हा प्रदेश अखेर स्वतंत्र झाला. सरकारी पातळीवर धर्मांतर हैदराबाद प्रांतातली परिस्थिती अत्यंत भीषण होती. बाहेरून धान्य येणे बंद झालेले. निजामाने लेव्हीचा हुकूम काढलेला. एखाद्या शेतकऱ्याला जर दहा पोते धान्य झाले, तर दोन पोते सरकारला विकावे लागे. मात्र, अधिकारी दोन ऐवजी पाच-पाच पोते धान्य घेऊन जात. शेतकऱ्यांना घरी काही खायलाही काही रहायचे नाही. रझाकारांचे खून, बलात्कार, अत्याचार प्रचंड वाढलेले. याला संस्थानच्या सरहद्दीवर काही प्रतिकार शिबिरे स्थापन करून विरोध सुरू झालेला. हिंदूंना मंदिरात जाता येत नव्हते. काही ठिकाणी गुंडगिरी करून यात्रा बंद पाडल्या होत्या. शाळांमध्ये उर्दू सक्तीची शाळांमध्ये चौथीनंतर शिकण्यासाठी ऊर्दू माध्यम होते. निजामाने हैदराबाद संस्थानची संपूर्ण संस्कृतीच बदलण्याचा चंग बांधलेला. त्यामुळे मराठवाड्यात मराठी, कर्नाटकाच्या भागातली कन्नड आणि तेव्हाच्या आंध्र प्रदेशची तेलगू ऐवजी सगळ्या शिक्षणाचे माध्यम केवळ उर्दू होते. शासनाची भाषा उर्दू होती. सर्व व्यवहार उर्दूत व्हायचे. तब्लिक नावाचे एक सरकारी खाते होते. त्याचा हेतू फक्त प्रजेच्या धर्मांतराचा होता. जागोजागी सरकारी पातळीवर धर्मांतर करून मुस्लीम बनवले जाई. विशेष म्हणजे या साऱ्या कट्टरतेला स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ ते अनंतराव भालेरावांनी धर्मनिरपेक्ष लढ्याने उत्तर दिले. अनंतराव भालेरावांची पार्श्वभूमी तत्कालीन औरंगाबाद आणि सध्याच्या छत्रपती संभाजीनगरातल्या वैजापूर तालुक्यातले खंडाळा हे अनंतराव भालेरावांचे गाव. इथले कुलकर्णीपण त्यांचे वडील काशीनाथबुवांकडे. ते वारकरी. अनंतरावांचा जन्म 14 नोव्हेंबर 1919 चा. त्यांचे वडील काही काळ रोटेगाव रेल्वे स्टेशनवर जीनिंग फॅक्टरीचे व्यवस्थापकही होते. त्यामुळे शाळेचे शिक्षण तिथून सुरू झाले. तर सातवीपर्यंतचे शिक्षण गंगापूरच्या आत्याकडे पूर्ण केले. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी तेव्हाचे औरंगाबाद आणि आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आले. दहावीच्या परीक्षेत संस्कृतमध्ये राज्यात पहिले अनंतराव धावणी मोहल्ल्यात एक खोली करून रहायचे. ते दहावीच्या परीक्षेत संस्कृतमध्ये राज्यात पहिलेले आलेले. त्यांना तेव्हा पंधरा रुपयांची शिष्यवृत्ती मिळालेली. त्याचा शिक्षणाला हातबार लागलेला. त्यांनी पुढचे शिक्षण इथेच इंटमिजिएट कॉलेजात केले. वाचनाचे वेड लागलेले. त्याच काळात गोविंदभाई श्रॉफ यांच्या संपर्कात आले आणि गांधीवादाकडे वळले. अनंतरावांनी विद्यार्थी दशेपासूनच स्वतःला स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले. मराठवाड्यात सत्याग्रह केला अनंतराव भालेराव यांनी वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी सक्तमजुरी भोगली. देशात 1935 चा कायदा आलेला. त्यामुळे मुंबई आणि मद्रास राज्यामध्ये लोकनियुक्त सरकार स्थापन झालेले. याचीच भीती हैदराबादच्या निजामाला होती. त्याने भाषण, लिखाणावर बंधने आणली. हिंदूचे सक्तीने धर्मांतर सुरू केले. राजकीय संघटना स्थापन करण्यास बंदी आणली. कर्मचारी फक्त मुस्लिमांची भरती सुरू केली. त्यामुळे सर्वत्र असंतोष धुमसत होता. हैदराबाद स्टेट काँग्रेस संघटना स्थापन होण्यापूर्वी फक्त एक दिवस अगोदर त्यावर बंदी आणली गेली. हैदबादेत सत्याग्रह झाला. या लढ्याचे नेतृत्व परभणीच्या ॲड. गोविंदराव नानल यांनी केले. मराठवाड्यातही सत्याग्रह करण्याचे ठरले. त्यासाठी अनेकांनी नाव नोंदणी केली. 18 व्या वर्षी सक्तमजुरी भोगली ऐन सत्याग्रहाच्या दिवशी नाव नोंदवलेल्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला दांडी मारली. आता करायचे कसे? प्रसंग बाका उद्भवला. येथेच अवघ्या अठरा वर्षांच्या अनंतरावांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. भीमराव सोनदे, रघुनाथ भालेराव यांच्यासोबत वैजापूरमधील महादेव मंदिरापासून सत्याग्रह आंदोलन सुरू झाले. बाजारपेठेपर्यंत आंदोलक वंदे मातरमच्या घोषणा देत गेले. पोलिसांची पाचावर धारण बसली. अनंतराव भालेराव स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले. वैजापूर न्यायालयात त्यांच्यासह इतर मित्रांना दोन महिन्यांची सक्तमजुरी आणि शंभर रुपयांच्या दंडाची शिक्षा झाली. मात्र, शंभर रुपये भरायचे कोठून असा प्रश्न पडला. तिघांनीही निमूटपणे तीन महिन्यांची शिक्षा भोगली. अनंतराव भालेरावांचे येथून हैदराबाद स्वातंत्र्यलढ्यात पदार्पण झाले. पानसरेंची बैलगाडी थांबवून हत्या अनंतराव भालेराव यांच्याकडे महाराष्ट्र परिषदेच्या नांदेड जिल्हा संघटकाची जबाबदारी आलेली. वर्ष होते 1945-46 चे. मात्र, जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी निजामाचे सारे प्रयत्न सुरू होते. इत्तेहादुल मुस्लिमीन या कट्टर संघटनेला निजामाने बळ दिलेले. ‘रझाकारांनी’ प्रचंड अत्याचार सुरू केलेले. याविरोधात स्वातंत्र्यसैनिकांनी आंदोलन, लिखाणापासून ते भाषणापर्यंत आघाडी उघडलेली. मुधोळ तालुक्यात महाराष्ट्र परिषदेचे संघटक म्हणून गोविंदराव पानसरे काम करत होते. त्यांनी केलेले एक भाषण त्याकाळी प्रचंड चर्चेत आलेले. निजाम सरकारने त्यावर आक्षेप घेत बिलोली न्यायालयात खटला दाखल केला. मात्र, येथे गोविंदराव पानसरेंना जामीन मिळाला. कोर्टातून ते गावी निघाले. तेव्हा रझाकारांनी अर्धापूरजवळ पानसरे यांची बैलगाडी थांबून त्यांचा तलवारीने निर्घृण हत्या केली. ही घटना सोमवारी घडलेली. निजामाच्या क्रूर पोलिसांचे प्राण वाचवले पानसरे यांच्या हत्येविरोधात प्रचंड जनमत तयार झाले. या ठिकाणी दर सोमवारी मोठा जमाव जमू लागला. जणू एखादी यात्राच. पानसरेंच्या पहिल्या स्मृतिदिनी म्हणजे 6 जानेवारी 1947 रोजी याच ठिकाणी 25 हजार लोक आले. परवानगी नसताना येथे सभा घेण्याचा निर्धार काँग्रेसने केला. सभा सुरू झालेली. मात्र, त्याचवेळी बिलोलीचा फौजदार झैदी पोलिस घेऊन आला. त्याने केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले, अनेक जण जखमी झाले. जमाव प्रचंड संतप्त झाला. त्यांनी झैदीसह वीस पोलिसांना घेरले. त्यांना ठार मारण्याचा पण केला. मात्र, त्याचवेळी अनंतराव भालेराव आणि त्यांचे सहकारी आले. त्यांनी या जमावापासून झैदीसह त्यात क्रूर पोलिसांचे प्राण वाचवले. एकीकडे निजाम कट्टरपणे हिंदूच्या कत्तली करत होता. रझाकारांचा छळ सुरू होता. त्याला उत्तर मात्र अतिशय धर्मनिरपेक्ष पद्धतीने आणि मानवतेने दिले जात होते. तिरंगा फडकावण्याची घोषणा आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. मात्र, हैदराबाद संस्थान अजूनही पारतंत्र्यात होते. निजाम राज्य सोडायला तयार नव्हता. राज्य करण्याचा अधिकार केवळ मुस्लिमांनाच असा दावा करणाऱ्या इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या पाठीशी निजामाने सर्व ताकद उभी केलेली. त्यामुळेच रझाकारांच्या अत्याचाराकडे लक्ष देणे तर सोडाच उलट निजाम सरकारने खतपाणी घालणे सुरू केलेले. हैदराबाद प्रांतात रझाकाराने बलात्कार, जाळपोळ आणि धर्मांतर सुरू केलेले. कर्नाटकातल्या बिदरची बाजारपेठ जाळली. हैदराबादजवळचे बीबीनगर रेल्वेस्टेशन पेटवले. नांदडेजवळचे गोरठा, लोहा येथे जाळपोळ केली. खून पडले जात होते. एकीकडे देश स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा करत होता. मात्र, हैदराबाद प्रांतात रझाकारांचे क्रूर अत्याचार सुरू होते. रक्ताचे पाट वाहत होते. या संकटामुळे लोकांना जीव नकोसा झालेला. नांदेड जिल्ह्यातली जनता पेटून उठली. त्यांनी 9 ऑगस्ट रोजी सार्वजनिक जागी तिरंगा फडकावण्याची घोषणा केली. ईदची मिरवणूक आणि तिरंगा मात्र, या दिवशी नेमकी ईद. हीच संधी साधून ईदची जंगी मिरवणूक काढून दंगल भडकावायची असा कट रझाकारांनी रचला. काँग्रेस नेत्यांना या पडद्याआडच्या खेळीची कल्पना आली. अनंतराव भालेरावांनी नांदेड गाठले. जिल्ह्याची पाहणी केली. तेव्हा त्यांना इथले स्फोटक वातावरण समजले. काहीही करून इथे दंगल होऊ द्यायची नाही, असा निर्धार त्यांनी केला. त्यांच्या मदतीला भगवानराव गांजवे, श्यामराव बोधनकर होतेच. या साऱ्यांनी कलेक्टर अखलाख हुसेनला परिस्थितीची माहिती दिली. तेव्हा त्यांनी ईदची मिरवणूक झाल्यानंतर तिरंगा उभारा, असा आदेश दिला. नांदेडची दंगल थोडक्यात टळली मात्र, जनतेला थांबवणे अवघड होते. त्यांनी काँग्रेस कार्यालयात तिरंगा फडकावलाच. हे कलेक्टर अखलाख हुसेन यांना समजले. त्यांनी तातडीने काँग्रेस कार्यालयाकडे धाव घेतली. दुसरीकडून ईदची मिरवणूक आली. शेवटी अखलाख यांनी स्वतःची शेरवानी काढत हा तिरंगा झाकण्याचा प्रयत्न केला. रझाकार चाल करून आले. शेवटी अनंतराव भालेराव, श्यामराव बोधनकर पुढे आले. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना बाजूला केले. समजावले. आणि होणारी दंगल टळली. पोलिसांची हत्या म्हणजे सत्याग्रह नव्हे… आता हा शेवटचा प्रसंगही असाच. तेव्हा शिंदीच्या झाडापासून तयार होणारे मद्य विकले जाई. या मद्याला मोठी मागणी असे. मात्र, निजामाने ही झाडे तोडायला बंदी घातली. कारण या झाडांमधून निजाम सरकार मोठा महसूल जमा करायचे. अनंतराव भालेरावांसह काँग्रेस नेत्यांनी त्याकाळी जंगल सत्याग्रह सुरू केलेला. याचाच भाग म्हणून आठ ते दहा हजार शेतकरी पाटनूरजवळच्या अपरंपाराच्या माळावर शिंदीची झाडे तोडायला गेली. त्यांच्यापुढे अनंतरावांचे सत्याग्रह नेमका कशासाठी, हे भाषण झाले. सगळ्यांमध्ये वीरश्री संचारली. भारतमाता की जय च्या घोषणा दिल्या. शिंदींच्या झाडांची कत्तल सुरू झाली. पोलिसांना जमावाने घेरले पोलिसांना या सत्याग्रहाची बातमी समजली. त्यांची गाडी तातडीने तिथे पोहचली. या पोलिसांच्या गाडीला सत्याग्रहींनी रोखले. हजारो जणांचा जमाव त्यांच्यावर चालून गेला. गाडीमध्ये फक्त एक फौजदार आणि मोजून 12 पोलिस होते. सत्याग्रहींनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांना रझाकारांचे अत्याचार आठवले. आता पोलिसांची काही खैर नव्हती. एकही जण वाचण्याची शक्यता नव्हती. हे ध्यानात येताच अनंतराव भालेराव पुढे आले. त्यांनी आंदोलकांना थांबवले. पोलिसांची पाचावरण धारण बसलेली. फौजदारासह घाबरलेल्या बारा जणांनी मोठ्याने रडायला सुरुवात केली. तेव्हा अनंतराव भालेराव काँग्रेसच्या आंदोलकांना म्हणाले, ‘याद राखा, पुढे याल तर…’ त्यांनी साऱ्यांना थांबवले. जीव घेणे तेव्हा खूप सोपे, पण… पोलिसांनी स्वतःहून बंदुका सत्याग्रहींकडे सुपूर्द केलेल्या. त्यांचे कपडे उतरवले गेले. त्यांच्यापैकी एकाच्या खांद्यावर तिरंगा झेंडा दिला. त्यांना झेडांना सॅल्यूट करायला लावले. शेवटी या आठ ते दहा हजार सत्याग्रहींसमोरून शरमेने खाली माना घालून त्यांना जावे लागले. निजामी आणि रझाकारी अत्याचारांचा बदला म्हणून या पोलिसांचा जीव घेणे तेव्हा खूप सोपे होते. मात्र, अनंतराव भालेरावांनी तसे होऊ दिले नाही. कारण हा स्वातंत्र्यलढा कोणत्याही धर्माला लक्ष्य म्हणून, कोणत्याही व्यक्तीला लक्ष्य म्हणून लढला गेलाच नाही. हा लढा धर्मांध निजाम आणि अत्याचारी रझाकारांविरुद्ध सेक्युलर विचाराने लढला गेला. त्यामुळे हे यश अधिकच झळाळते. संदर्भ
Source link
हैदराबाद मुक्तिसंग्राम:निजामाची धर्मांधता अन् रझाकारांच्या क्रूरतेला अनंतरावांनी दिलेला सेक्युलर लढा; वाचा मराठवाड्याची गाथा!