Headlines

Dharashiv Vaishnavi Bhosale Tops MPSC Exam; Inspiring Success Story


पाऊल ठाम असेल तर वाट निर्माण होते, जिद्द मनात असेल तर स्वप्नं सत्यात उतरतात आणि ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्याची ताकद असेल, तर अशक्यही एक दिवस शक्य होते!

.

यशाचा क्षण अवघ्या काही सेकंदांचा असतो. मात्र, त्या एका क्षणामागे अनेक वर्षांचा संघर्ष, असंख्य जागलेल्या रात्री, मनाला लागलेले टोमणे, अपयशाची सल आणि न थांबणारी जिद्द असते. जेव्हा मेहनतीला यशाचं फळ मिळतं, तेव्हा त्या क्षणी आतापर्यंतचा प्रत्येक संघर्ष डोळ्यांसमोर उभा राहतो. धाराशिव जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या वैष्णवी भोसलेसोबतही अगदी असंच काहीसं घडलं.

MPSCचा निकाल लागला आणि मैत्रिणीने फोन करून सांगितलं, “तुझी निवड झालीय…” हे शब्द कानावर पडताच वैष्णवीला काही क्षण आभाळाचं ठेंगणं झालं. काय प्रतिक्रिया द्यावी, हे सुद्धा सुचत नव्हतं. आनंदाला पारावार उरला नव्हता. हात-पाय थरथरत होते. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि मनात मात्र गेल्या अनेक वर्षांचा संघर्ष एखाद्या चित्रपटाच्या फ्लॅशबॅकप्रमाणे सुरू झाला होता.

13-14 तास केलेला अभ्यास, आतापर्यंत दिलेल्या परीक्षा, अपयशाची आलेली निराशा, लोकांचे टोमणे, शिक्षणाला झालेला विरोध आणि या सगळ्यात खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेले आई-वडील… सगळं काही त्या एका क्षणात डोळ्यांसमोर उभं राहिलं. ही केवळ एका परीक्षेच्या निकालाची आनंदाची बातमी नव्हती, तर अनेक वर्षांच्या संघर्षाला मिळालेलं उत्तर होतं. जाणून घेऊयात, या जिद्दी वैष्णवीच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी…

धाराशिव जिल्ह्यातील विठ्ठलवाडी हे साधारण हजार ते बाराशे लोकसंख्येचं छोटं गाव. गावात शिक्षणाचं महत्त्व फारसं कुणाला माहिती नसल्याने येथे केवळ चौथीपर्यंतच शाळा होती. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मुलांना दुसऱ्या गावात जावं लागायचं. त्यातही मुलींच्या शिक्षणाबाबतची परिस्थिती अधिकच वेगळी. गावातील मुलींचं दहावीपर्यंत शिक्षण झालं की, त्यानंतर लगेच लग्न लावून देण्याची जणू काही गावची प्रथाच झाली होती. अशाच वातावरणात वैष्णवी लहानाची मोठी झाली. मात्र, लहानपणापासूनच तिच्यातील हुशारी वेगळी होती. शाळेतील प्रत्येक परीक्षेत ती प्रथम क्रमांक मिळवायची. तिची ही गुणवत्ता शिक्षकांनी हेरली आणि तिच्या मनात मोठं स्वप्न रुजवलं. “तू पुढे शिक्षण घेतलंस तर एक दिवस क्लास वन अधिकारी होऊ शकतेस,” या शिक्षकांच्या शब्दांनी वैष्णवीच्या मनात आशेची पालवी फुटली आणि तिने त्याच दिशेने आपली पावलं टाकायला सुरुवात केली.

मात्र, गावातील परिस्थिती तिच्या स्वप्नांना साथ देणारी नव्हती. शिक्षणाचं महत्त्व फारसं माहिती नसल्याने गावकरी वैष्णवी आणि तिच्या आई-वडिलांना वारंवार एकच सांगायचे, “मुलगी आता मोठी झाली आहे, तिचं लग्न करून टाका.” शिक्षणापेक्षा लग्नाला प्राधान्य देणाऱ्या या मानसिकतेचा सामना वैष्णवीच्या कुटुंबाला करावा लागला. मात्र तिच्या आई-वडिलांनी समाजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मुलीच्या स्वप्नांवर विश्वास ठेवला. परिस्थिती साधी होती, साधनं मर्यादित होती, पण मुलीने पाहिलेलं स्वप्न मोठं होतं. आई आशा वर्कर म्हणून काम करत होती, तर वडील पेट्रोल पंपावर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. स्वतःच्या कष्टांची पर्वा न करता त्यांनी मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं. गावकऱ्यांचा आणि नातेवाईकांचा विरोध पत्करून त्यांनी वैष्णवीला शिक्षणाची वाट मोकळी करून दिली.

त्यांचा हा विश्वास वैष्णवीनेही तितक्याच ताकदीने खरा ठरवला. MPSC गट-ब संयुक्त परीक्षेत तिने घवघवीत यश मिळवलं. वैष्णवीची राज्य कर निरीक्षक आणि दुय्यम निबंधक या दोन्ही पदांसाठी निवड झाली. विशेष म्हणजे, अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून राज्यातील मुलींमध्ये दोन्ही पदांसाठी प्रथम क्रमांक मिळवण्याची कामगिरी तिने केली. एका छोट्याशा गावातून आलेल्या या मुलीने आपल्या मेहनतीच्या जोरावर राज्याच्या पातळीवर आपली वेगळी छाप उमटवली.

या यशाबद्दल बोलताना वैष्णवी सांगते, “मी राज्य सेवा परीक्षेची तयारी करत होते. तेव्हा माझ्या एका मैत्रिणीने मला फोन केला आणि निकाल पाहायला लावला. तेव्हा मला काय रिॲक्ट करावं, तेच समजत नव्हतं. माझे हात-पाय थरथर कापत होते, डोळ्यांतून अश्रूंच्या धारा निघत होत्या आणि डोक्यात फ्लॅशबॅक व्हावा तसा सगळा भूतकाळ आठवत होता. तो 13-14 तास केलेला अभ्यास, आतापर्यंत दिलेल्या परीक्षा, लोकांचे टोमणे आणि आई-वडिलांनी दिलेली साथ… सगळं सगळं आठवून मी फक्त रडत होते. मला एवढा आनंद झाला होता की मी शब्दांत व्यक्तच करू शकत नव्हते आणि आजही करू शकत नाही. कारण जी मेहनत मी घेतली होती, लोकांनी माझ्या शिक्षणाला जो विरोध केला होता आणि माझ्या जन्मदात्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला होता, तो मी सत्यात उतरवला. हा विचार करून अजूनही माझे डोळे पाणावतात. मला यासाठी खूप विरोध पण झाला. पण आज माझा निकाल पाहून ज्यांनी विरोध केला तेच डोक्यावर घेऊन मिरवतात. याचा आनंद आहे.”

गावातल्या सामान्य कुटुंबातून आलेली एक मुलगी शिक्षणासाठी बाहेर पडते आणि आपल्या मेहनतीने स्वतःची ओळख निर्माण करते, ही गोष्टच मुळात प्रेरणादायी आहे. अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या वैष्णवीची जिद्द खरोखरच अनेकांसाठी आदर्श ठरणारी आहे. वैष्णवीने गावात चौथीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी गावाजवळच्या शाळा आणि महाविद्यालयात प्रवेश घेतला. MPSC करायचं, अधिकारी व्हायचं, हे तिने अगदी लहानपणापासूनच ठरवलं होतं. त्यामुळे बारावीनंतर तिने गावाजवळच असलेल्या क्लासेसमध्ये प्रवेश घेतला आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. त्यानंतर पुण्यातील दीपस्तंभ फाउंडेशन-मनोबल प्रकल्पाच्या पुणे केंद्रातून स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण घेतलं आणि अखेर आपल्या मेहनतीचं चीज करून दाखवलं. आज वैष्णवी तिच्या गावातील पहिली आणि एकमेव अधिकारी ठरली आहे.

स्पर्धा परीक्षेच्या तयारीतील आपल्या अनुभवाबद्दल वैष्णवी सांगते, “सुरुवातीला थोडं कठीण गेलं. कारण एकंदरीत सांगणारे भरपूर असतात. पण करायचं आपल्याला असतं. मला सायन्स खूप अवघड जात होतं. पण नंतर माझ्या मेंटॉरने मला मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे मी PYQ व्यवस्थित बघायला लागले, त्याचं अनालिसिस करायला लागले. जे हाय स्कोअरिंग टॉपिक आहेत, त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्कोअर इम्प्रूव्ह करायचा. त्यानुसार मी अभ्यास केला आणि माझा जो वीकपॉईंट होता, त्याला मी माझा स्ट्रॉंग पॉईंट बनवलं. यामध्ये मला दीपस्तंभ फाउंडेशनने खूप मदत केली. मला असं वाटतं की, जर आपण क्लासेस लावून अभ्यास केला तर आपल्याला प्रॉपर गाईडन्स मिळतो. त्यामुळे यश लवकर प्राप्त होतं.”

वैष्णवीचं स्वप्न केवळ एखाद्या पदापर्यंत पोहोचण्याचं नव्हतं; तिचं स्वप्न होतं IAS अधिकारी होण्याचं. लहानपणापासूनच ती त्याचा विचार करायची. मात्र जसजशी ती मोठी होत गेली, तसतशी आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही तिला जाणवू लागली. बाहेरगावी जाऊन शिक्षण घेणं आणि त्यासाठी होणारा खर्च कुटुंबाला परवडणारा नव्हता. त्यामुळे वैष्णवीने गावाजवळ उपलब्ध असलेल्या क्लासेसमध्ये प्रवेश घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली. त्याच काळात तिने राज्यसेवा परीक्षेचीही तयारी सुरू केली होती. मात्र, योग्य आणि पुरेसं मार्गदर्शन मिळत नसल्याने तिने संयुक्त परीक्षेकडे अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीपुढे IAS होण्याचं स्वप्न काही काळासाठी बाजूला ठेवावं लागलं. या गोष्टीची खंत वैष्णवीच्या मनात आजही आहे. मात्र स्वप्न अपूर्ण राहिलं म्हणून ती थांबली नाही.

या प्रवासात वैष्णवीला अपयशाचाही सामना करावा लागला. एका टप्प्यावर तिच्यासमोर दोनच पर्याय होते एक म्हणजे सगळं सोडून द्यायचं किंवा पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची. तिने दुसरा पर्याय निवडला. अपयशाने खचून न जाता त्यातून काय शिकता येईल, याचा विचार केला. याच काळात शिक्षक, मेंटॉर आणि कुटुंबीयांनी तिला पुन्हा उभं राहण्यासाठी आधार दिला. “एक परीक्षा म्हणजे संपूर्ण आयुष्य नाही,” हा विचार मनाशी पक्का करून तिने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली.

त्या काळातील अनुभव सांगताना वैष्णवी म्हणते, “मी राज्य सेवा परीक्षेच्या मेन्सची तयारी करत होते. तेव्हा मी सलग तेरा-चौदा तास अभ्यास केला. सुरुवातीला मला आत्मविश्वास होता की, मी इंटरव्ह्यू क्रॅक करेन. कारण पहिल्या पेपरमध्ये माझा स्कोअर चांगला आला होता. मात्र मी तिथे हारले. माझा स्कोअर खूप कमी आला आणि इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचू शकले नाही. तेव्हा वाटलं होतं की, आपण किती मेहनत केली, किती अभ्यास केला; पण यश मिळालं नाही. पूर्ण निराशा आली होती. तेव्हा वाटलं की, सोडून देऊ सगळं. पण नंतर मनाचा निर्धार केला आणि माझ्या शिक्षकांकडे गेले. त्यांनी मला यातून उभं राहायला सांगितलं. मला कुठेतरी त्याची खंत वाटते. मात्र घरात मी मोठी असल्यामुळे काहीही झालं तरी आपल्याला कोणतीतरी पोस्ट मिळवायची आहे. हा ध्यास मनात घेतला आणि त्यानुसार कामाला लागले.”

या अपयशाने वैष्णवीला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली, ती म्हणजे स्पर्धा परीक्षेत केवळ तासन्‌तास अभ्यास करणं पुरेसं नसतं; तर तो अभ्यास योग्य दिशेने होणं अधिक महत्त्वाचं असतं. आपल्या तयारीत नेमकी कुठे कमतरता आहे, कोणते विषय अधिक महत्त्वाचे आहेत, परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि आपला स्कोअर कुठे सुधारू शकतो, याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. त्यामुळे वैष्णवीने मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला, PYQचं बारकाईने विश्लेषण केलं आणि टॉपिकनुसार तयारीला दिशा दिली. ज्या विषयात ती कमकुवत होती, त्याच विषयावर अधिक मेहनत घेत तिने त्या वीकपॉईंटचं स्ट्राँग पॉईंटमध्ये रूपांतर केलं. सातत्य, योग्य दिशा आणि स्वतःच्या चुका ओळखून त्यावर काम करण्याची तयारी, हेच तिच्या यशाचं महत्त्वाचं गमक ठरलं.

आज वैष्णवीला आपल्या गावात शिक्षणाचं महत्त्व वाढवायचं आहे. आपल्या गावातील मुलींनाच नव्हे, तर मुलांनाही शिक्षणाची दिशा मिळावी, अशी तिची इच्छा आहे. तिच्यासारखे अनेक अधिकारी आपल्या गावातून घडावेत, हे तिचं स्वप्न आहे. भविष्यात अधिकारी म्हणून काम करताना शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचं ध्येयही तिने मनाशी बाळगलं आहे. ज्या गावाने तिचा संघर्ष पाहिला, त्याच गावातील पुढच्या पिढीला संघर्ष कमी करावा लागावा, यासाठी काहीतरी करण्याची तिची इच्छा आहे.

वैष्णवीच्या या यशामागे तिच्या आई-वडिलांचा सिंहाचा वाटा आहे. गावकऱ्यांचा आणि नातेवाईकांचा विरोध पत्करून, स्वतः कष्ट करत त्यांनी आपल्या मुलीच्या स्वप्नांना बळ दिलं. आई आशा वर्कर म्हणून काम करत राहिली, तर वडिलांनी पेट्रोल पंपावर काम करून कुटुंबाचा गाडा ओढत मुलीच्या शिक्षणासाठी हातभार लावला. परिस्थितीने त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे केले; पण त्यांनी मुलीच्या स्वप्नासमोर त्या प्रश्नांना कधीच मोठं होऊ दिलं नाही. आज त्याच मुलीने आपल्या कर्तृत्वाने त्यांच्या विश्वासाचं सोनं केलं आहे.

वैष्णवीला कधी तिच्या शिक्षणाला विरोध करणारे, “मुलगी मोठी झाली, आता लग्न करून टाका,” असं सांगणारे लोक आज तिच्या यशाचं कौतुक करत आहेत. ज्या मुलीला शिक्षणापेक्षा लग्नाचा विचार करण्याचा सल्ला दिला जात होता, तीच मुलगी आज शासकीय अधिकारी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे वैष्णवीचं यश हे केवळ एका परीक्षेत मिळवलेलं यश नाही; तर तिच्यावर लादल्या जाणाऱ्या सामाजिक चौकटींना तिने दिलेलं शांत आणि ठाम उत्तर आहे.

वैष्णवीसाठी ही लढाई केवळ स्वतःच्या करिअरसाठी नव्हती. आपल्या आई-वडिलांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवायचा, ही तिची सर्वात मोठी प्रेरणा होती. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी आई-वडील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, याची जाणीव तिला सतत होती. “घरात मी मोठी आहे. त्यामुळे काहीही झालं तरी आपल्याला कोणतीतरी पोस्ट मिळवायची आहे. माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी खूप काही केलं. त्यांचा विश्वास मला खरा करून दाखवायचा होता,” हा विचार तिच्या मनात कायम होता. आणि अखेर तिने तो विश्वास खरा करून दाखवला.

वैष्णवीने दाखवून दिलं की, संधी कमी असल्या तरी स्वप्नं मोठी पाहता येतात. परिस्थिती प्रतिकूल असली तरी मेहनत थांबवायची नसते. अपयश आलं तरी त्याला शेवट समजायचा नसतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे, हे ठरवणं गरजेचं असतं. कारण तुमच्या स्वप्नांवर प्रश्न उपस्थित करणारे अनेक जण भेटतील; पण त्या स्वप्नांसाठी शेवटपर्यंत लढायचं की नाही, हा निर्णय शेवटी तुमचाच असतो.

आज वैष्णवीच्या यशामुळे तिच्या आई-वडिलांची मान अभिमानाने उंचावली आहे. ज्या गावात कधीकाळी तिच्या शिक्षणाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते, त्याच गावात आज तिच्या नावाचा अभिमानाने उल्लेख केला जातोय. जे लोक कधीकाळी तिच्या शिक्षणाच्या विरोधात बोलले, तेच लोक आज तिच्या यशाची कहाणी अभिमानाने इतरांना सांगत आहेत. काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि त्याचबरोबर वैष्णवीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनही बदलला. पण या सगळ्यात वैष्णवीने कोणालाही शब्दांनी उत्तर दिलं नाही. तिने आपल्या मेहनतीनं उत्तर दिलं. तिने आपल्या यशानं उत्तर दिलं. आणि तिने आई-वडिलांच्या विश्वासाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. गावातल्या एका छोट्याशा घरातून सुरू झालेला हा प्रवास आज राज्याच्या पातळीवर पोहोचला आहे.

वैष्णवीची कहाणी सांगते की, परिस्थिती तुमच्या स्वप्नांपेक्षा मोठी नसते. साधनं कमी असली तरी जिद्द सोडायची गरज नसते. अपयश आलं म्हणून प्रवास संपत नाही. उलट, कधी कधी तेच अपयश आपल्याला आपल्या ध्येयाकडे अधिक ताकदीने घेऊन जातं आणि म्हणूनच वैष्णवीची ही कहाणी केवळ MPSCमध्ये अव्वल स्थान मिळवलेल्या एका मुलीची कहाणी नाही; ती आहे स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या मुलीची, तिच्या स्वप्नांसाठी समाजाच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या आई-वडिलांची आणि अपयशानंतरही हार न मानणाऱ्या जिद्दीची कहाणी. आज तिच्या यशाचा डंका वाजतोय…आणि काल तिच्या स्वप्नांवर प्रश्न उपस्थित करणारेच आज तिचं नाव अभिमानाने घेत आहेत. खरंच, जिद्द असेल, मेहनत असेल आणि आई-वडिलांचा आशीर्वाद असेल, तर गावाच्या छोट्याशा वाटेवरून निघालेली पावलंही एक दिवस यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.