Headlines

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन:एकाच सरणावर 35 हुतात्मे; मात्र नांदेडच्या शौर्यगाथेला अभ्यासक्रमात अजूनही स्थान नाही




मराठवाडा मुक्तिसंग्रामात नांदेड जिल्ह्यातील कल्हाळीच्या (ता. कंधार) मातीवर 29 ते 31 जुलै 1948 दरम्यान रक्ताचा आणि अश्रूंचा अभिषेक झाला. साडेबारा गावांची जहागिरी असणारे थोर स्वातंत्र्यसेनानी अप्पासाहेब नाईक यांच्या गढीवर तिरंगा फडकवून गाव स्वतंत्र झाल्याची घोषणा झाली होती. यामुळे चवताळलेल्या निजामाचे 3 हजार 500 रझाकार, 500 निजामी पोलिस व जालना येथील 770 सैनिकांच्या तुकडीने गावाला पूर्ण वेढा घातला. मुखेडच्या अमिनाच्या (सबइन्स्पेक्टर) नेतृत्वाखालील या आधुनिक शस्त्रास्त्रांच्या हल्ल्याला गावकऱ्यांनी भक्कम उत्तर दिले. अप्पासाहेबांकडील 150 ते 200 भरमार बंदूकधारी आणि गावातच तयार झालेले बॉम्ब, बारूद, तलवारी, भाले व गोफणी घेऊन गावकरी गढीवरून प्राणपणाने लढले. सलग तीन दिवस-रात्र हा थरार सुरू होता. गढीवरील दारूगोळा, अन्न व पिण्याचे पाणी संपले. समोरासमोरच्या तलवारी आणि भाल्यांच्या लढाईत अप्पासाहेब नाईक व त्यांच्या 7 साथीदारांना लढता-लढता वीरमरण आले. अप्पासाहेबांसह या 35 हुतात्म्यांना गढीतील लाकडे जमा करून एकाच सरणावर भडाग्नी दिला. दरम्यान, शौर्यगाथेला अभ्यासक्रमात अजूनही स्थान नाही. शासकीय अनास्थेचा 75 वर्षांचा वनवास चिमूर-आष्टी आणि बलियाच्या लढ्याला जो राष्ट्रीय सन्मान मिळाला तो कल्हाळीला मिळू नये हा 35 हुतात्म्यांचा अवमान असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. कंधार आणि लोहा तालुक्याने मुक्तिसंग्रामात 59 हुतात्मे दिले, पण स्मारकांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. ज्यांनी देशासाठी रक्त सांडले त्या गावाला साध्या एसटी बससाठी आणि स्मारकासाठी 75 वर्षे प्रशासकीय उंबरठे झिजवावे लागले यासारखे दुर्दैव कोणते? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. लढा अभ्यासक्रमात घ्यावा 75 वर्षांच्या वनवासानंतर गावात स्मारक उभे राहत आहे याचे समाधान आहे. पण शासनाने केवळ वास्तू उभारून थांबू नये. या 35 हुतात्म्यांचा इतिहास जोवर शालेय अभ्यासक्रमात येत नाही तोवर या बलिदानाला खरा न्याय मिळणार नाही. -सुरेश कल्हाळीकर, उपसरपंच तथा स्मारक समिती सदस्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर वास्तू उभी, पण न्याय अजूनही नाही डॉ. उत्तमराव सोनकांबळे व गावकऱ्यांच्या प्रखर पाठपुराव्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या मंत्रिमंडळ बैठकीत शासनाला या इतिहासाची आठवण झाली. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 29 जणांची समिती नेमून भूसंपादन झाले व आता भव्य स्मारक उभे राहिले आहे. पण केवळ सिमेंटची वास्तू उभारून शासनाची जबाबदारी संपते का? एकाच सरणावर 35 अंत्यसंस्काराची ही दुर्मिळ घटना मुख्य इतिहासापासून आजही कोसो दूर असल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली. केवळ वास्तू नको, हक्क हवा. स्मारक उभे राहिले असले तरी वैचारिक उपेक्षा कायम आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *