![]()
मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीत सुरू असलेले 20 दिवसांचे उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी अचानक स्थगित करून राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत दिली आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सरकारने मराठा समाजाला न्याय जरूर द्यावा, पण त्यांच्यासमोर झुकून ओबीसी समाजाचे वाटोळे का केले?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मराठा-ओबीसी आरक्षण, जरांगेंवरील भ्रष्टाचाराचे आरोप, मराठवाड्याचा दुष्काळ आणि नागपुरातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था यावरून सरकारला धारेवर धरले. ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा नको आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, “मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, याला आमचा कधीच विरोध नव्हता. परंतु, एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजाच्या घटनात्मक हक्कांवर गदा येता कामा नये. या सरकारने ओबीसींचे अक्षरशः वाटोळे केले आहे. ओबीसींच्या 378 जातींपैकी 200 जातींमधील लोकांचे दरडोई उत्पन्न 2 हजार रुपयेही नाही. कोणीतरी रस्त्यावर ताकद दाखवली म्हणून सरकार ओबीसींचे नुकसान करत असेल, तर जनता त्यांना कधीही माफ करणार नाही.” जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये छुपा समझोता? मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर संशय व्यक्त करताना वडेट्टीवार यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. “जरांगे पाटील यांच्या जवळच्या एका व्यक्तीला जलसंपदा विभागाची हजारो कोटींची कामे मिळाली होती. ही कामे मुख्यमंत्र्यांनी थांबवली, म्हणूनच जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना शिव्या घातल्या का? त्याच रागातून ते मुंबईला निघाले होते का? आणि आता अचानक उपोषण स्थगित करण्यामागे सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात नेमका कोणता ‘समझोता’ झाला आहे?” असे अनेक धारदार सवाल त्यांनी उपस्थित केले. मराठवाड्याच्या तोंडाला फक्त पाने पुसली मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली. “मराठवाड्यात यंदाही पावसाचा मोठा खंड पडल्याने पिके धोक्यात आली आहेत आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. 2023 मध्ये मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी 66,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात आजवर केवळ 13,000 कोटी रुपयेच देण्यात आले आहेत. मते मागताना मोठ्या घोषणा करायच्या आणि दुष्काळ जाहीर करूनही निधी द्यायचा नाही, ही मराठवाड्याच्या जनतेची निव्वळ दिशाभूल आहे.” खाण्यासाठी तेल नाही, आणि भाजप म्हणते दिवे लावा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने केलेल्या आवाहनावर वडेट्टीवार यांनी उपरोधिक टीका केली. “एकीकडे पंतप्रधान जनतेला ‘तेल कमी वापरा’ असा सल्ला देतात आणि दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पंतप्रधानांच्या वाढदिवसाला ‘दिवे लावा’ असे आवाहन करतात. देशातील कोट्यवधी लोकांनी दिवे लावले तर किती तेल खर्च होईल? आज जनतेच्या घरात खाण्यासाठी तेल नाही, तिथे ते दिव्यात कुठून टाकणार? यापैकी नेमके कोणाचे खरे मानायचे?” असा टोला त्यांनी लगावला. नागपूरची कायदा-सुव्यवस्था ‘रामभरोसे’; पोलिसांवर गंभीर आरोप नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारीवरही त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “2026 च्या पहिल्या 8 महिन्यांत नागपूर शहरात हिंसक गुन्ह्यांमध्ये 43 टक्क्यांची प्रचंड वाढ झाली असून, हत्येच्या प्रयत्नांचे 147 गुन्हे दाखल झाले आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरापर्यंत ड्रग्स पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांचे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर असलेल्या नागपुरात अशी भयावह परिस्थिती असेल, तर प्रशासनाने स्वतःच्या जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.” तसेच, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करताना ते म्हणाले, “काही पोलीस अधिकारी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी आहेत. जर ‘कुंपणच शेत खाऊ लागले’, तर जनतेने दाद कोणाकडे मागायची? आज पोलीस पैशांसाठी गणेश मंडळांपर्यंत पोहोचले आहेत, उद्या ते घरात घुसून खोट्या केसेसच्या धमक्या देऊन तिजोऱ्या लुटतील. गुन्हेगारांना पोलिसांचा वरदहस्त असल्यामुळेच शहरात गुन्हेगारी वाढत आहे,” असा खळबळजनक आरोप करत त्यांनी या प्रकाराच्या सखोल चौकशीची मागणी केली. ———— हेही वाचा… छत्रपती संभाजीनगरात मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी उबाठाचा सरकारविरोधात एल्गार: उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष मराठवाड्याचा वाढता अनुशेष, भीषण दुष्काळ, पाणीप्रश्न आणि बेरोजगारी यांसारख्या प्रश्नांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत चालवलेल्या ‘तुमसे ना हो पायेगा’ या जनआंदोलनाचा समारोप आज, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी होत असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या थेट नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयावर तीव्र निदर्शने केली जाणार आहेत. आज होणाऱ्या आंदोलनात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
मराठ्यांना न्याय द्या, पण ओबीसींचे हक्क हिरावू नका:वडेट्टीवार आक्रमक; मोदींच्या वाढदिवशी तेलाचे दिवे लावण्याच्या आवाहनावरूनही सुनावले खडेबोल