Headlines

यशाधिपतीः काश्मीरच्या -13°C तापमानात पाय घसरत होते:तरीही 57 मीटरचा थ्रो मारून रचला वर्ल्ड रेकॉर्ड! वाचा सिद्धीची गोष्ट…




आयुष्य प्रत्येकाला एकसारखं मिळत नाही. काहींच्या वाट्याला संघर्ष येतो, काहींच्या वाट्याला संधी; तर काहींच्या वाट्याला संघर्षासोबत स्वतःला सिद्ध करण्याची जबाबदारीही येते. मात्र, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात जिद्द असेल, तर बंद झालेल्या प्रत्येक दरवाजामागे एक नवा मार्ग नक्कीच सापडतो. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धी काळेची कहाणीही अशीच आहे. लहानपणापासून खेळाची आवड, मैदानावरची चमक, एकटेपणाची बोचरी जाणीव, वडिलांचं अचानक जाणं आणि त्यानंतर आलेलं नैराश्य… या सगळ्यांतून वाट काढत सिद्धी पुन्हा पाय रोवून उभी राहिली. आज तिच्या हातात पदकं आहेत, गळ्यात अनेक सन्मान आहेत आणि डोळ्यांत देशासाठी खेळण्याचं मोठं स्वप्न आहे…. सिद्धी मूळची सोलापूरची. लहान असतानाच कुटुंबासोबत छत्रपती संभाजीनगरला आली. लहानपणापासूनच स्फूर्तीने भरलेली सिद्धी खेळामध्ये माहीर होती. प्रत्येक गोष्टींमध्ये सहभाग घेणं आणि त्यात अव्वल येणं हे जणू तिच्या नसानसामध्ये होतं. त्यामुळे शाळेत कोणतीही स्पर्धा असो सिद्धी त्यात खेळणार म्हणल्यावर सर्व स्पर्धक आधीच हार मानायचे. खेळ सिद्धीसाठी जणू एक वरदानच. फक्त खेळच नव्हे तर सिद्धी इतर ॲक्टिव्हिटीमध्येही ती पुढेच असायची. यावर बोलताना सिद्धी सांगते,’मी शाळेत असताना प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचे. त्यातल्या त्यात धावायला मला आवडायचं. त्यामध्ये मी नेहमीच पहिला क्रमांक मिळवायचे. माझी स्पीड एका वेळेनंतर सगळ्यांना कळाली होती. त्यामुळे माझ्यासोबत भाग घ्यायचा म्हणजे त्यांच्यासाठी मोठं कोडं असायचं. ते आधीच हार मानायचे. मला ट्रॉफी भेटल्यानंतर खूप आनंद तर व्हायचा. पण मग त्यानंतर माझ्यासोबत शाळेतल्या विद्यार्थ्यांचं वागणं नकोस व्हायचं.’ सिद्धी पुढे सांगते,’ते त्यांचे त्यांचे ग्रुप करून राहायचे आणि मला मात्र एकटीलाच राहावं लागायचं. लहान असल्यामुळे काही गोष्टी समजायच्या नाहीत. मी ट्रॉफी आणायचे. मात्र, माझ्यासोबत कोणीच बोलत नाहीत म्हणून घरी जाऊन रडत बसायचे. पण या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून माझं काम करत राहिले. जेव्हा त्यांनी माझं यश पाहिल, तेव्हा मग त्यांनीच समोर येऊन मैत्रीचा हात पुढे केला.’ सिद्धी सांगते, ‘तुम्हाला खाली पाडणारे लोक भरपूर असतात. मात्र तुमच्यात जर जिद्द असेल, तर तुमचं कामच त्यांना तुमचं अस्तित्व जाणवून देतं.’ पुढे तिने शहरातीलच महात्मा गांधी मिशन या महाविद्यालयात कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. तेव्हा तिला खेळाबद्दल संपूर्ण माहिती मिळाली आणि तिने त्यातच करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. कॉलेजमध्ये शिक्षकांनी सिद्दीची कला ओळखली आणि तिला त्याबद्दल मार्गदर्शन केले. सिद्धीच्या या निर्णयाला सुरुवातीला तिच्या आईने विरोध केला होता. मात्र नंतर तिने आईला विश्वास दिला. हा प्रसंग सांगताना सिद्धी म्हणते, ‘मला सुरुवातीला खेळाबद्दल काहीच माहिती नव्हतं. मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथेच शरद पवार सर होते. त्यांनी मला आत्मविश्वास दिला. त्यावेळी मला एवढंच माहिती होत की 100 मीटर पळायचं असतं. बाकी त्याचे इव्हेंट होतात आणि हे खेळ नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलला खेळले जातात हे माहिती नव्हतं. सरांनी मला सांगितलं आणि त्याप्रमाणे मी प्रॅक्टिस सुरू केली. रनिंग, भाला फेक, 100 मीटर आणि शॉट पूट अशा खेळांचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर झालेल्या मॅचमध्ये पहिला क्रमांक मिळवला. तेव्हा सरांनी मला सांगितलं की ‘तू जर विना प्रॅक्टिसच एवढं चांगल खेळू शकतेस, तर भरपूर प्रॅक्टिस केल्यावर खूप पुढे जाशील.’ तेव्हा मला सरांनी मोदी सरांकडे पाठवलं. ते इंटरनॅशनल लेव्हलचे खेळाडू तयार करतात. मग मी हे सगळं आईला सांगितलं. तेव्हा तिनं सुरुवातीला मला परवानगी नाकारली. त्यासाठी मी मार सुद्धा खाल्ला. मग माझ्या आईने जेव्हा माझ्या ट्रॉफी बघितल्या तेव्हा तिला वाटलं की, नाही यात आपली मुलगी पुढे जाऊ शकते.’ आईचा विरोध सिद्धीने विश्वासात बदलला. त्यानंतर सुरू झाला तो मैदानी प्रवास. मैदानावर तासनतास सराव करणे, घाम गाळने हेच आयुष्य झाले. यादरम्यान सिद्धी वर्ग खोलीमध्ये कमी आणि ग्राऊंडवर जास्त दिसत होती. सुरुवातीला ॲथलेटिक्समध्ये अधिक लक्ष दिले. त्यातही तिने बाजी मारली. यासोबतच तिला नंतर ice stock खेळाबद्दल कळले आणि त्यातही तिने स्वतःला रुळवून घेतले. आज याच खेळामुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली आहे. खेळामुळे अनेकवेळेस सिद्धीने शिक्षकांचे बोलणे देखील खाल्ले आहेत. सिद्धी सांगते, ‘माझ्या क्लासमध्ये मी एकटी अशी मुलगी होते की, जिला खेळामध्ये आवड होती. सगळेजण एका बाजूला आणि मी एका बाजूला अशी परिस्थती होती. त्यामुळे एक दिवस मला माझ्या मॅडम खूप रागावल्या. तुला खेळ म्हणजे सर्व काही वाटतं का? खेळामध्ये असं काय पडलं आहे, जे तू अभ्यास सोडून तेच करत बसतेस. ते ऐकून मला थोडं वाईट वाटलं. पण तेव्हाच खेळातच झोकून द्यायचा निर्धार पक्का झाला. त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रीय पातळीवरचे पदक मिळवले. तेव्हा सगळ्यात आधी त्याच मॅडमचा तुझ्यावर गर्व आहे, असा मेसेज आला.’ खरोखर आपण जेव्हा इतरांपेक्षा स्वतःवर अधिक विश्वास ठेवायला लागतो ना, तेव्हा आपण जगातली कोणतीही कठीण गोष्ट शक्य करू शकतो. हे सिद्धीच्या उदाहरणावरून कळते. सिद्धीने तीन वेळेस राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केलं. उत्तराखंडला झालेल्या सामन्यांमध्ये चार सुवर्णपदक मिळवले. त्याचबरोबर मूळचा जर्मनीचा असलेल्या ice stock खेळासाठी सिद्धीची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेसाठी ती जाणारही होती. मात्र,आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तिथे जाण पुढे ढकलले गेले. आता पुढच्या सहा महिन्यांत सिद्धी महाराष्ट्राचे आंतराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करणार आहे. Ice stock खेळ नेमका कसा खेळला जातो? Ice Stock हा युरोपातील Alpine प्रदेशातून विकसित झालेला पारंपरिक खेळ असून तो प्रामुख्याने ऑस्ट्रिया, जर्मनी, इटली आणि स्वित्झर्लंडसह अनेक देशांत खेळला जातो. या खेळात वजनदार ‘Ice Stock’ लक्ष्याच्या दिशेने सरकवला जातो आणि तो ‘Daube’ या लक्ष्याच्या शक्य तितका जवळ नेण्याचा प्रयत्न केला जातो. Stock योग्य दिशेने आणि योग्य ताकदीने सोडण्यासाठी खेळाडूला अचूकता, संतुलन, ताकद आणि एकाग्रता यांची आवश्यकता असते. या खेळाचे Team Game, Target Competition, Distance Competition आणि Rapid Competition असे विविध प्रकार आहेत. सुरुवातीला बर्फावर खेळला जाणारा हा खेळ आता विशेष कृत्रिम किंवा डांबरी पृष्ठभागावरही खेळला जातो. युरोपबरोबरच भारतातही या खेळाचा प्रसार वाढत असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडू या खेळात सहभागी होत आहेत. ice stock चे साधारण वजन हे 5 किलो असते. मात्र ते नियमानुसार बदलत जाते. सध्या या खेळामुळेच सिद्दीची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ज्यांनी तिच्या क्षमतेवर बोट उचलले होते तेच आज तिचे कौतुक करताना थकत आहेत. वडील गेले तेव्हा नैराश्याने ग्रासले… सिद्धीने अजून स्वप्नही पाहायला सुरुवात केली नव्हती. मात्र, नियतीने घाला घालत वडिलांचे छत्र हिरावून घेतले. सिद्धीसाठी तिचे बाबाच सर्वकाही होते. तेव्हा सिद्धी दहावीला होती. बाबांनी तिच्या प्रत्येक निर्णयात साथ दिलेली. पण आधारच गेल्यामुळे तिला नैराश्याने ग्रासले. प्रत्येक खेळामध्ये पुढे असणारी सिद्धी त्यादिवसानंतर एका रूम मध्ये बंदिस्त झाली. कोणाशी बोलणं नाही, कोणाचं ऐकणं नाही, ना कुठला खेळ, ना कशात भाग घेणं. तिनं सर्व काही बंद केलं. पती गेल्यामुळं सविता यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळलेला. मात्र, समोर तीन लेकरांचे चेहरे आणि त्यांचं भविष्य दिसत होतं. त्यामुळं दुःखाला कवटाळून न बसता त्यांनी खंबीरपणे उभे राहण्याचा निश्चय केला. आईच्या या जिद्दीकडे बघत सिद्धीनेही इथून पुढे जो कोणता खेळ खेळेन तो केवळ आणि केवळ बाबांसाठी खेळेन हा निर्धार केला. हा प्रसंग आठवताना आजही सिद्धीचे डोळे पाणावतात. ती सांगते,’माझे बाबा माझ्यासाठी सर्वकाही आहेत. तेच मला मी लहान असताना ग्राऊंडवर खेळायला घेऊन गेलेले. त्यांनीच माझ्या मनात खेळाबद्दल प्रेम निर्माण केलं. ते माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या सोबत असायचे. मी त्यांना रोज मिस करते. आज जर ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता की माझी सिद्धी आज नाव कमवतीये. मला फक्त एकाच गोष्टीच जास्त वाईट वाटतं की माझे बाबा माझी प्रगती बघायला नाहीत. पण ते जिथे कुठे असतील तिथून ते मला बघत असतील आणि त्यांना अभिमान वाटत असेल. आमचं नातं एवढं घट्ट आहे की मी माझ्या बाबांसाठी काहीही करायला तयार आहे. मी जी कोणती ट्रॉफी जिंकेन ती अगोदर मी माझ्या बाबांना दाखवते. मी आज जी आहे ती केवळ आणि केवळ त्यांच्यामुळेच आहे. त्यांच्यामुळेच मी माझं स्वप्न जगू शकतेय.’ आता सिद्धी जी मॅच खेळेते त्यामध्ये ती मेडेल आणते म्हणजे आणतेच. हे यश तिला तिच्या नशिबामुळे नाही तर तिचा स्वतःवर असलेल्या विश्वासामुळे आणि जिद्दीमुळे प्राप्त होते. एकही शब्द कोणाशी बोलू न शकणारी सिद्धी आज MGM शाळेत एक स्पोर्ट टीचर म्हणून काम करत आहे. त्याचबरोबर ती आपली स्पर्धकाची भूमिकाही बजावते. सिद्धी सांगते की, ‘तिच्या आईमुळे तिची ओळख निर्माण झाली आहे. जेव्हा केव्हा सिद्धीचे नाव येईल तेव्हा त्याआधी सिद्धीच्या आईचे नाव येते. माझ्या आईने माझ्यासाठी जे केलं आहे त्यापेक्षा अधिक मला तिला द्यायचं आहे.’ काश्मीरची मॅच… सिद्धी ज्या स्पर्धेला जाईल तिथून मेडल घेऊन येणे हे तिचे रेकॉर्ड होते. मात्र काश्मीरच्या सामन्यात -13 डिग्री तापमान होते. त्यामुळे अशा वातावरणात खेळणे शक्य नव्हते. तेव्हा सिद्धी मनाने खचली होती. कारण थंड तापमानामुळे बाहेर बर्फ पडत होता. तेवढ्या थंडीत 5 किलोचा स्टॉक उचलून तो थ्रो करणे थोडे कठीण गेले. बर्फ असल्यामुळे सिद्धीचे पाय तिथे सटकत होते. हात पाय थर-थर कापत होते. याबद्दल सिद्धी सांगते, ‘तो प्रसंग माझ्यासाठी खूप डेंजर होता. माझा तो विंटर नॅशनल लेव्हलचा पहिलाच सामना होता. तिथल्या थंड वातावरणामुळे माझी तब्येत जरा बिघडली होती. यामुळे मी जसं हवं तसं प्रदर्शन करू शकले नाही आणि मला गोल्ड मेडलला मुकावे लागले.’ बर्फावरून पाय सटकत असल्यामुळे सिध्दीने त्यासाठी स्पेशल शूज देखील घातले होते. मात्र थ्रो व्यवस्थित न गेल्यामुळे तिचा आत्मविश्वास ढासळू लागला. मात्र सिद्धीने पूर्ण जोर लावत सेकंड थ्रोला तिने संपूर्ण बळ एकवटून स्टॉक घेतला आणि 57 मीटरचा थ्रो करत वर्ल्ड रेकॉर्ड केला. तेव्हा सिद्धीच्या डोळ्यातून अश्रू निघत होते. हा क्षण सिद्धीसाठी खूप अविस्मरणीय होता. मात्र, फायनल थ्रोमध्ये सिद्धी थोडक्यात गोल्डला मुकली. केवळ 3 मीटरच्या फरकाने सिद्धी गोल्ड मिळवू शकली नाही. तरीही तिने 1 सिल्वर आणि 1 ब्राँझ असे मेडल जिंकले. मात्र, आईच्या अपेक्षेवर खरी उतरू न शकल्यामुळे तिचे मन डळमळत होते. ती सांगते, ‘माझा पहिला विंटर सामना होता. त्यामुळे माझ्या सरांना आणि आईला माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या की सिद्धी गोल्ड घेऊनच परत येणार. मात्र, मी त्यांच्या अपेक्षेवर खरी उतरू शकले नाही. मी कस सामोरं जाऊ हेच मला कळत नव्हतं. पण ते म्हणतात ना की आयुष्यात एक तरी हार पाहिजे. त्यामुळे मी निराश न होता ठरवलं की इथून पुढे जे करेन त्यात 100 % देईल आणि झालेल्या चुका पुन्हा होऊ देणार नाही. त्यानंतर पुढची नॅशनल उत्तराखंड डेहराडूनला हेमाद्री रिंक होती. ही इंटरनॅशनल रिंक होती आर्टिफिसिअल. तिथे 4 इव्हेंटमध्ये मी भाग घेतला आणि चारही इव्हेंटमध्ये मी गोल्ड मिळवलं.’ नावातच सिद्धी असल्यामुळे ती प्राप्त केल्याशिवाय न थांबणारी सिद्धी खरोखर सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सिद्धीला तिच्या पुढील आयुष्यात ऑलम्पिक खेळायचे आहे. भारताला जागतिक पातळीवर प्रेझेन्ट करायचे आहे. तसेच दिल्ली येथे होणाऱ्या परेडमध्ये देखील सहभागी होण्याचे तिचे स्वप्न आहे. त्यासाठी सिध्दी कॉलेजमधली मज्जा-मस्ती बाजूला ठेवते. फक्त आपल स्वप्न पूर्ण करायचं, यावरच तिचा अधिक भर आहे. सिद्धीला हा विश्वास आहे की ती एक ना एक दिवस केलेल्या सर्व त्यागाला यशाने उत्तर देईल.’ सिद्धीचा हा विश्वासच तिची सर्वात मोठी ताकद आहे. ती सांगते की, ‘आजकालची मुलं-मुली घरात बसून मोबाइलवर गेम खेळतात. त्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि आपल्यातली क्षमता ओळखून त्यावर काम केलं पाहिजे.’ सिद्धीची हीच जिद्द तिच्या यशाचं खूप मोठं कारण ठरत आहे. असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *