![]()
गणेशोत्सव म्हणजे केवळ आकर्षक रोषणाई आणि झगमगाट नव्हे, तर भक्तीच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्याची एक पर्वणी असते. हीच उदात्त संकल्पना प्रत्यक्षात आणत पैठण येथील नाथवंशज पुष्कर महाराज गोसावी यांनी यंदा ‘ना प्लास्टिक, ना केमिकल’ या सूत्राचा अवलंब केला आहे. त्यांनी संपूर्णपणे कागदाचा वापर करून उत्तराखंडमधील पवित्र केदारनाथ आणि बद्रीनाथ या दोन धामांचा हुबेहूब आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा देखावा साकारला आहे. हा निसर्गपूरक देखावा पूर्ण करण्यासाठी १३ दिवस रात्रंदिवस मेहनत घेण्यात आली. या देखाव्यात उत्तराखंडच्या निसर्गरम्य आणि दुर्गम वातावरणाची हुबेहूब अनुभूती भक्तांना मिळते. डोंगराच्या कुशीतील छोटी झाडे, उंचच उंच डोंगररांगा, नागमोडी रस्ते, नयनरम्य हिरवळ, बर्फाच्छादित कडे, खळाळणारी नदी आणि केदारनाथ व बद्रीनाथ मंदिरांच्या प्रतिकृती बारकाईने तयार केल्या आहेत. यात्रेदरम्यान रस्त्यांवर दिसणाऱ्या माहितीदर्शक पाट्याही अगदी स्पष्टपणे रेखाटण्यात आल्या आहेत, ज्यामुळे येथे येणाऱ्या भक्तांना प्रत्यक्ष दोन धामांची यात्रा केल्याचाच आनंद मिळत आहे. पुष्कर महाराज गोसावी यांनी यापूर्वीच्या गणेशोत्सवात कर्नाटकातील गणपती मंदिराचा सुरेख देखावा तयार केला होता. यंदा त्यांनी दोन धाम यात्रेची ही संकल्पना मांडली. देखावा यशस्वी करण्यासाठी मनवा गोसावी, गणेश चिंधे आणि दत्ता घायाळ यांनी परिश्रम घेतले, रावसाहेब महाराज गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. शतकांची अनोखी परंपरा १०० वर्षांपासून नाथवाड्यात गणेशोत्सवाची परंपरा आहे. ती आजही जोपासली जात असून, यंदाही केदारनाथ-बद्रीनाथचा देखावा साकारण्यात आला आहे. भक्तीसोबतच पर्यावरण रक्षणाचा प्रभावी संदेश कल्पकता आणि सांघिक मेहनत भक्तीसोबतच पर्यावरण रक्षणाचा अत्यंत प्रभावी संदेश देणारी ही कलाकृती सध्या पैठणसह संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, दर्शनासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे.
Source link
माझे मंडळ, माझे नियोजन:पैठणच्या नाथवाड्यात केदारनाथचा देखावा, नाथवंशजांचा पुढाकार, देखाव्यासाठी 13 दिवसांचे परिश्रम