Headlines

चला जाणुया नदीला:जलक्रांती…भीमा, सीना, माण, आदिलासह ७ नद्या खळाळणार




“चला जाणूया नदीला “या अभियानात राज्यातील १०८ नद्या सोबतच सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना, दुबधुबी, आदिला, माणगंगा, कासाळगंगा, कोरडा आदी नद्यांचा समावेश केलेला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे नुकतीच यासंदर्भात बैठक झाली. नदी पुनर्जिवित करण्याच्या मोहिमेला गती देण्याबाबत मंत्री महाजन यांनी सूतोवाच केल्याने जिल्ह्यातील जलदूत, जलमित्र यांच्यातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. नद्या पुनरुज्जीवित करून वाहत्या झाल्याशिवाय पुढच्या पिढ्यांना जगता येणार नाही, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून नद्यांना पुनर्जीवित करण्यासाठी जलदूत, जलमित्र यांच्या माध्यमातून राज्यातील १०८ नद्यांची निवड करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “चला जाणूया नदीला ” या अभियानाचा शुभारंभ सन २०२२ साली वर्धा येथे केला होता. तेव्हापासून विविध उपक्रमाद्वारे स्थानिक पातळीवर लोक सहभागातून नद्यांची ओळख करून देण्याचे काम जलदूत व जलमित्र करत होते. या बैठकीत डॉ. राजेंद्रसिंह, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामविकासचे प्रधान सचिव डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, लाभ क्षेत्राचे सचिव प्रकाश मिसाळ, जलबिरादरीचे राष्ट्रीय समन्वयक सत्यनारायण बोलशेट्टी, महाराष्ट्र समन्वयक नरेंद्र चुग तसेच महेंद्र महाजन, डॉ.सुमंत पांडे, अभिनेते चिन्मय उदगीरकर, राजेश पंडित, मनोज साठे आदी उपस्थितीत होते. नद्या पुनरुज्जीवन अभियानावर सविस्तर चर्चा होऊन प्रस्तावास मान्यता देण्यात आली. गेल्या तीन वर्षात मोहिमेचे काम थांबले होते. या काळात प्रत्येक नदीचा तज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यामार्फत अभ्यास करुन लोक अभ्यासाच्या आधारावर कृती अहवाल तयार केला आहे. शासनस्तरावर कृती अहवाल तयार करुन विभागीय पातळीवर या क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या कार्यशाळा घेतल्या जातील. पहिल्या टप्प्यात नाशिक येथे संमेलन घेऊन नदी पुनरुज्जीवन मोहिमेला गती दिली जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *