Headlines

महावितरणचा निषेध:लासलगावी सायंकाळी 5 तासांचे भारनियमन; बाप्पाची आरती अंधारात, शिवसेनेसह शेतकरी, गणेशभक्तांचा अधिकाऱ्यांना घेराव‎




येथे ऐन गणेशोत्सवाच्या काळात सायंकाळी ६ ते रात्री ११ या तब्बल ५ तासांचे अघोषित भारनियमन केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. सणासुदीच्या दिवसांत बत्ती गुल होत असल्याने संतप्त शिवसैनिक (उबाठा), शेतकरी आणि गणेशभक्तांनी येथील महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घातला. सायंकाळच्या वेळी सलग ५ तास वीज गायब राहत असल्याने सायंकाळची आरती आणि धार्मिक कार्यक्रम अंधारात उरकण्याची वेळ गणेश मंडळांवर आली आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागावर ५ तासांचा अंधार लादून शहरांना मात्र सुरळीत वीज देण्याचा महावितरणचा हा दुटप्पी कारभार कदापि खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख शिवा सुराशे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप, डॉ. श्रीकांत आवारे, गणेश डोमाडे, उत्तमराव वाघ, बद्रीनाथ लोहारकर आदींसह शिवसैनिक व परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते. निफाड तालुक्यात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. टाकळी विंचूर परिसरात यापूर्वी तीन बिबटे जेरबंद झाले असून, नुकताच रात्रीच्या वेळी एका शेतकऱ्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला होता. जखमी शेतकऱ्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशा जीवघेण्या परिस्थितीत रात्री ५ तास वीज गायब राहत असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी अंधारात शेतात पाऊल टाकणे शेतकऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. ^आंदोलकांनी मांडलेल्या अडचणी आणि तक्रारींची नोंद घेतली आहे. या समस्येबाबत तातडीने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असून, भारनियमनाच्या या प्रश्नावर पुढील दोन दिवसांत निश्चितपणे ठोस निर्णय घेतला जाईल. – एम. तिवारी, उपअभियंता, महावितरण, चांदवड



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *