Headlines

वळण:मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रात्री विनोद पाटलांच्या बाप्पाची आरती; सकाळी जरांगेंचे उपोषण मागे




मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त बुधवारी (१६ सप्टेंबर) रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचे प्रमुख याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या ‘अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान’च्या गणेशोत्सवाला भेट देऊन बाप्पाची आरती केली. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. गुरुवारी (१७ सप्टेंबर) सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांचे उपोषण मागे घेतले. या दोन्ही घटनांमुळे मराठा आरक्षणाचा पुढील टप्पा आंदोलनासोबतच न्यायालयीन प्रक्रियेकडे झुकल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यातील सर्व उद्घाटन कार्यक्रम रद्द झाले होते. तरीही त्यांनी विनोद पाटील यांच्या गणेशोत्सवासाठी विशेष वेळ काढला. मुख्यमंत्री सुमारे ३० मिनिटे पाटील यांच्या निवासस्थानी होते. त्यांनी बाप्पाची आरती करून गणेशभक्तांना संबोधित केले. निमंत्रण दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. या वेळी खासदार डॉ. भागवत कराड, अभिजित देशमुख यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित होते. रात्री राजकीय हालचाली, पहाटे उपोषणावर तोडगा मुख्यमंत्र्यांच्या शहरातील अधिकृत कार्यक्रमांमध्ये अचानक बदल झाल्यानंतर, त्यांची विनोद पाटील यांच्या गणेशोत्सवातील उपस्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मुख्यमंत्री आरती करत असतानाच दुसरीकडे जरांगेंच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर वेगाने सूत्रे हलत होती. रात्रीच्या या घडामोडींनंतर पहाटेच शासकीय शिष्टमंडळ पाटोद्याला पोहोचले. उपोषण सोडवण्यात आले. त्यानंतर लगेचच विनोद पाटील यांनी न्यायालयीन लढाई अधिक गतिमान करण्याची घोषणा केली. त्यामुळे फडणवीस-पाटील यांची ही आरती मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावरून पुन्हा कोर्टात नेण्याचे संकेत देणारी ठरली आहे. याचिकाकर्ते विनोद पाटलांचा ‘कोर्टात लढाई’चा नारा जरांगे पाटील यांनी गुरुवारी पहाटे पाटोदा येथे शासकीय शिष्टमंडळाशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर उपोषण मागे घेतले. जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर विनोद पाटील यांनी समाजमाध्यमांवर आपली भूमिका स्पष्ट केली. “आज पुन्हा उत्सव झाला. बाराव्यांदा विजय झाला. आता आम्ही कोर्टात लढाई लढू. कायद्याने विजय मिळवू,’असा थेट नारा त्यांनी दिला. विनोद पाटील यांनी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयीन पातळीवर सोडवण्याची भूमिका घेतली. न्यायिक लढ्याची पार्श्वभूमी अशी विनोद पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील ‘अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान’चे संस्थापक आहेत. ते मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यातील प्रमुख याचिकाकर्ते आहेत. महाराष्ट्र सरकारने २०१४ मध्ये दिलेले १६ टक्के मराठा आरक्षण जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने स्थगित केले, तेव्हा विनोद पाटील यांनी मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या समर्थनार्थ मुंबई उच्च न्यायालयात मूळ याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयात राज्य शासन आणि विनोद पाटील यांच्या कायदेशीर चमूने सातत्याने पुरावे मांडले. मागासवर्ग आयोगाचा (गायकवाड आयोग) अहवालही सादर केला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयातही कॅव्हेट आणि याचिका दाखल केली. माझी कायदेशीर लढाई अधिक गतिमान होईल “मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी न्यायालयात लढत आहे. यापुढे मी ही लढाई अधिक गतिमान करणार आहे. मनोज जरांगे १२ वेळा लढले. त्यांचे मी अभिनंदनच करतो. मुख्यमंत्र्यांशी याबाबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यांना केवळ आरतीसाठी निमंत्रित केले. त्यांनी आमच्या विनंतीचा मान राखून उपस्थिती लावली.’ – विनोद पाटील, मराठा आरक्षणाचे मुख्य याचिकाकर्ते



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *