![]()
जिल्ह्यातील ग्राम बाल संरक्षण समित्या (व्ही-सीपीसी) प्रभावीपणे कार्यरत करण्यासोबत बालस्नेही पंचायत निर्माण करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. याशिवाय येत्या काळात बालविवाह प्रतिबंध आणि सखी सावित्री समित्यांच्या प्रभावी अंमलबजावणीवरही भर दिला ज
.
महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष संजय विष्णू पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बालहक्क संरक्षणासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी हे निर्णय घेण्यात आले. बैठकीला आयोगाच्या सदस्या गीतांजली बुटी, शुभांगी तांबट तसेच सदस्य संजय लाखे, अतुल देसाई आणि प्रविण भुजाडे उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये समित्यांच्या नियमित बैठका घेऊन त्यांचे इतिवृत्त व छायाचित्रे संकलित करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. ग्राम बाल विकास समित्या अधिक प्रभावीपणे कार्यरत करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. गावातील बालकांवर होणारे अन्याय, अत्याचार तसेच बालहक्कांचे उल्लंघन याबाबतची प्रकरणे समित्यांच्या माध्यमातून समोर यावीत. त्यावर वेळेत प्रतिबंधात्मक कार्यवाही करता यावी.
यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले. बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व जनजागृती करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. बालविवाहामुळे बालकांच्या आरोग्यावर, शिक्षणावर तसेच कुपोषणाच्या समस्येवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाईल. प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृतीपर फलक लावण्याबाबतही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रत्येक शाळेत सखी सावित्री समितीची स्थापना करून बालकांना व्यक्त होण्यासाठी सुरक्षित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या सूचनासुद्धा शिक्षण विभागाला देण्यात आल्या. शाळांमध्ये संवाद पेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या, अडचणी व भावना व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. बालकांशी प्रभावी व संवेदनशील सुसंवाद प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीला महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सिद्धेश्वर काळुसे उपस्थित होते.