![]()
ऑगस्टच्या सुरुवातीपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पाण्याअभावी खरीप पिके पूर्णपणे करपली असून, संपूर्ण तालुका दुष्काळाच्या छायेत सापडला आहे. या नैसर्गिक संकटामुळे बळीराजासह सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत. शासनाच्या सर्व विभागांनी आतापासूनच योग्य दक्षता बाळगून दुष्काळाचे परिस्थितीजन्य अहवाल सादर करताना कोणत्याही तांत्रिक त्रुटी राहणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना आमदार सुहास कांदे यांनी केल्या. एखादा विभाग दुष्काळी जाहीर करण्यासाठी महसूल, कृषी, पंचायत समिती अशा विविध विभागांमार्फत निकषांत तंतोतंत बसणारे व तांत्रिक बाबींची परिपूर्ण पूर्तता करणारे अहवाल सादर होणे आवश्यक असते. त्यात त्रुटी राहिल्यास पात्र असूनही संबंधित विभाग दुष्काळी जाहीर होण्यापासून वंचित राहतो. नांदगावात अशी कोणतीही प्रशासकीय त्रुटी राहू नये, यासाठी तालुक्यातील विविध विभागांतील अधिकारी व लोकप्रतिनिधींची विशेष समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी शीतल घोलप, तहसीलदार सुनील सैंदाने, मुख्याधिकारी शामकांत जाधव, कृषी व पंचायत समितीचे अधिकारी तसेच युवासेनाप्रमुख फरहान खान, नगराध्यक्ष सागर हिरे आदी उपस्थित होते. यंदा पुढे चांगला पाऊस होईल या आशेवर शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या अल्प पावसाच्या जोरावर पेरण्या उरकल्या. मात्र, ऑगस्ट, अर्धा सप्टेंबर कोरडा गेल्याने पिकांची वाढ खुंटली. पिकांना कणसे आलीच नाहीत; परिणामी महागडी बियाणे खरेदी आणि मशागतीचा केलेला खर्च वाया जाऊन शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही, अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील नदी, नाले, बंधारे आणि विहिरी कोरड्या पडल्याने आगामी रब्बी हंगामही पूर्णपणे वाया जाण्याची भीती बैठकीत व्यक्त करण्यात आली. यावर प्रशासनाला तालुक्यातील सद्यस्थितीची पूर्ण कल्पना असून, पंचनामे व वस्तुनिष्ठ अहवाल सादर करताना कोणतीही त्रुटी राहणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.
Source link
नांदगाव तालुका दुष्काळाच्या छायेत:परिपूर्ण, त्रुटींशिवाय अहवाल सादर करा