![]()
कोंढवा पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक केली आहे. अमन जमील खान (वय २७, रा. सुप्रीम लिगा सोसायटी, इनामनगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. खान हा सराईत गुन्हेगार असून, तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांचे पथक कोंढवा परिसरात गस्त घालत असताना, साईबाबानगर परिसरात अमन खान थांबला असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी पुष्पेंद्र चव्हाण आणि केशव हिरवे यांना मिळाली. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून खानला पकडले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल सापडले. हे पिस्तूल त्याने कोणाकडून आणले आणि ते का बाळगले होते, याचा तपास पोलीस करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष चौधरी, प्रशांत मंडले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र गावडे, सागर पवार, हवालदार अमोल हिरवे, रवींद्र चिप्पा, कानिफनाथ कारखेले, राहुल रासगे, अमित सूर्यवंशी, रियाज पटेल, रवी जाधव आणि पुष्पेंद्र चव्हाण यांनी ही कारवाई केली. पत्र्याचे आच्छादन कोसळून दोघे जखमी नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारातील पत्र्याचे आच्छादन कोसळून दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना कोंढव्यातील लुल्लानगर भागात घडली. लुल्लानगर भागात एका नियोजित गृह प्रकल्पाचे काम सुरू आहे. बहुमजली इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानांचे काम पूर्ण झाले आहे. तळमजल्यावर ओैषध विक्री, एक उपाहारगृह सुरू झाले आहे. गृहप्रकल्पाचे काम सुरू असल्याने राडारोडा पडू नये म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव बांधकाम व्यावसायिकाने ठेकेदाराकडून पत्र्याचे आच्छादन बसवले आहे. तळमजल्यावरील दुकानाच्या बाहेर हे आच्छादन बसविण्यात आले आहे. औषध विक्री आणि उपाहारगृहातून दोघे जण बाहेर पडले. त्या वेळी पत्र्याचे आच्छादन अचानक कोसळले. दोघांच्या अंगावर पत्रा कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती नागरिकांनी त्वरित अग्निशामक दलाला दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.
Source link
डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या सराईत आरोपीला अटक:अमन खानकडून पिस्तूल-काडतूस जप्त, कोंढवा पोलिसांची कारवाई