![]()
नांदेड येथे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीदरम्यान कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह काही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी काजू-बदामाचा आस्वाद घेत असल्याचे चित्र संतापजनक असून मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा मराठवाड्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गजानन कावरखे यांनी शनिवारी ता १९ दिला आहे या संदर्भात कावरखे यांनी सांगितले की, मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन, कापूस यासह विविध खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत, नुकसानभरपाई, पीकविमा आणि दुष्काळी उपाययोजनांची अपेक्षा आहे. मराठवाड्यात पावसाच्या अनियमिततेमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी नांदेड जिल्हा नियोजन सभागृहात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. दुष्काळी परिस्थितीवर चर्चा सुरू असताना बैठकीच्या ठिकाणी काजू-बदामाचा पाहुणचार होणे दुर्दैवी आहे. एकीकडे शेतकरी पावसाअभावी करपलेल्या पिकांकडे पाहत आहे, उत्पादन खर्चही निघण्याची परिस्थिती नसताना दुसरीकडे दुष्काळी आढावा बैठकीत अशा प्रकारचा पाहुणचार कसा काय होऊ शकतो, असा सवाल गजानन कावरखे यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची परिस्थिती समजून घेण्याची गरज असताना वातानुकूलित सभागृहात बसून दुष्काळाचा आढावा घेणे आणि त्याचवेळी काजू-बदामावर ताव मारणे हा शेतकऱ्यांच्या भावनांचा अपमान असल्याचे कावरखे यांनी म्हटले आहे. शेतकरी संकटात असताना शासनाच्या बैठकीतील हा प्रकार अत्यंत असंवेदनशील असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘शेतकऱ्यांना काजू-बदाम नकोत, त्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी तातडीची मदत हवी आहे. पिकांचे पंचनामे, पीकविम्याची भरपाई, नुकसानभरपाई आणि दुष्काळी उपाययोजना यांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासनाने गांभीर्य दाखवावे,’ अशी मागणी कावरखे यांनी केली. शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहासाठी मोठा प्रश्न असताना लोकप्रतिनिधींचा दुष्काळी आढावा बैठकीतील काजू-बदामाच्या पाहुणचाराचा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असल्याचा पुनरुच्चार करत, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह बैठकीला उपस्थित असलेल्या संबंधित सर्व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी गजानन कावरखे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने न पाहिल्यास संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच, हिंगोलीच्या निर्लज्ज नेत्यांचे राजिनामे घ्या, अशी प्रतिक्रिया क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे दिली. —————– ही बातमी पण वाचा.. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अन् दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांचा काजू-बदामावर ताव!:नांदेडमधील आढावा बैठकीतील प्रकाराने सरकारवर टीकेची झोड महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे भीषण सावट पसरले आहे. शेतात उभी असलेली खरीप पिके डोळ्यांदेखत करपून गेली असून, बळीराजाच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत. शेतकरी सरकारकडून तत्काळ दुष्काळ जाहीर होण्याची आणि आर्थिक मदतीची चातकासारखी वाट पाहत असतानाच, नांदेडमध्ये राज्यकर्त्यांच्या असंवेदनशीलतेचे संतापजनक आणि चीड आणणारे दर्शन घडले आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठकीत चक्क मंत्री, खासदार आणि आमदारांसाठी काजू-बदामाचा शाही पाहुणचार ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बैठकीत लोकप्रतिनिधी काजू-बदामावर ताव मारत दुष्काळाची चर्चा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सविस्तर वाचा
Source link
दुष्काळी बैठकीत काजू-बदामावर ताव:‘शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार’, गजानन कावरखेंचा आंदोलनाचा इशारा