![]()
सावेडी येथील राजेश परदेशी यांच्या निवासस्थानी दरवर्षी गौरी-गणपती उत्सवानिमित्त सामाजिक विषयावर आधारित देखावा साकारला जातो. यंदा ‘आपत्तीमुक्त, सुरक्षित समाजाकडे’ ही संकल्पना घेऊन नैसर्गिक आपत्तीच्या काळात सज्ज, सुरक्षित व संवेदनशील समाज निर्माण करण्याचा संदेश देणारा देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे घरातील जुन्या व वापरात नसलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करून ‘टाकाऊ वस्तूंपासून सर्जनशीलता’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. देखाव्याच्या मध्यभागी महापुराचे वास्तवदर्शी दृश्य साकारण्यात आले आहे. कापसाच्या माध्यमातून पुराचे पाणी व त्याची तीव्रता दाखवण्यात आली असून त्यामध्ये नागरिक, लहान मुले आणि प्राणी अडकलेले दाखवले आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाकडून बोटीच्या साहाय्याने, हेलिकॉप्टरद्वारे तसेच दोराच्या माध्यमातून बचावकार्य केले जात असल्याचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले आहे. देखाव्याच्या एका बाजूला एनडीआरएफचे कार्यालय दाखवून आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या काळातील तातडीचे बचावकार्य आणि आपत्तीनंतरची मदत यामध्ये प्रशिक्षित बचाव पथकांची भूमिका अधोरेखित केली आहे. तर पूरग्रस्तांसाठी सुरक्षित निवारा, रुग्णालयीन सुविधा तसेच अन्न, वस्त्र व आवश्यक साहित्याच्या मदत संचांचे वितरण दाखवून संकटाच्या काळात समाजाने एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याचा संदेश दिला आहे. हा देखावा साकारण्यासाठी राजेश परदेशी यांच्या पत्नी निलम, कन्या साजरी आणि आई बिजला यांनी परिश्रम घेतले. हा उपक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असून नागरिकांनी आवर्जून भेट देऊन सामाजिक संदेश देणारा हा देखावा पाहावा, असे आवाहन परदेशी परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे. नदी-नाल्यांमध्ये टाकण्यात येणारे प्लास्टिक व कचरा यामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन काही परिस्थितीत पूरस्थिती गंभीर होण्यास हातभार लागू शकतो, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.‘नदीत कचरा टाकू नका—नदीचा नैसर्गिक प्रवाह जपूया’ असा संदेश देण्यात आला आहे. तसेच जनजागृती करणारी माहितीपत्रकेही लावण्यात आली आहेत.
Source link
सण-उत्सवातून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे!:परदेशी कुटुंबियांनी साकारला एनआरडीएफ आणि महापूर बचावकार्याचा देखावा