![]()
लंडन येथील ‘महाराष्ट्र मंडळ’ आयोजित यंदाच्या गणेशोत्सवात डोंबिवलीतील ‘गद्रे बंधू’ यांनी साकारलेली पर्यावरणपूरक अष्टविनायकाची सजावट विशेष आकर्षण ठरली आहे. 36 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या उत्सवात 16×8 फुटांच्या व्यासपीठावर साडेतीन फुटी गणरायाची मूर्ती आणि दोन्ही बाजूंस अष्टविनायकाची आठ सुशोभित पॅनेल्स उभी करण्यात आली आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लंडनमध्ये या देखाव्याचे आणि श्रींचे दर्शन घेतले. डोंबिवलीचे मयूरेश आणि स्मिता गद्रे यांनी मूळ संकल्पना, डिझाइन आणि मांडणी (लेआउट) तयार केली. चिरेबंदी लाल हॅन्डमेड कागद, पुठ्ठा, एमडीएफ आणि कापडी पडद्यांचा वापर करून अष्टविनायकांच्या शास्त्रीय यात्रेच्या क्रमानुसार पॅनेल्स सजवली गेली. अॅड. हरीश चव्हाण (डिजिटल लेझर कटिंग डिझाइन), भगवान भंडारी (लेझर कटिंग), रोहन ढवळे (लाकडी चौकटी जोडणी) आणि सुलेखनकार उमेश पांचाळ (कॅलिग्राफी श्लोक) यांच्या सहभागाने हा देखावा पूर्ण झाला. 21 पॅकेट्सचा सागरी प्रवास हा सर्व देखावा 21 मोठ्या पॅकेट्समध्ये सुरक्षित पॅक करून ‘पेस कुरियर’द्वारे लंडनला रवाना करण्यात आला. अवघ्या चार दिवसांत ही सामग्री लंडनला पोहोचली. महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष वृषाल खांडके, संस्थापक अध्यक्ष सुधाकर खुरजेकर आणि ज्युनिअर मित्र जैलेश देशपांडे यांनी व्हिडिओ कॉल आणि नकाशाच्या आधारे लंडनमध्ये हा देखावा यशस्वीपणे जोडला. सुभेदार वाडा गणेशोत्सवाचा अनुभव आणि आर्टिस्ट राम जोशी यांच्या मार्गदर्शनामुळे ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सजावट साकारणे शक्य झाल्याचे मयूरेश गद्रे यांनी सांगितले.
Source link
लंडनच्या गणपतीला डोंबिवलीचे मखर:महाराष्ट्र मंडळात अष्टविनायकाच्या देखाव्याने वेधले सर्वांचे लक्ष