![]()
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्णपणे आत्मसमर्पण केले असून, देशाच्या आर्थिक हितांचा बळी दिला जात असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. “रशियन तेलाच्या आयतीवरून भारताला धमकावणारा अमेरिका स्वतःच्या अणुऊर्जा उद्योगासाठी रशियाकडून युरेनियम खरेदी करत आहे. अमेरिकेचा हा उघड दुटप्पीपणा पंतप्रधान मोदी उघडा का करत नाहीत?” असा थेट सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भारत-अमेरिका संबंध आणि केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. अमेरिकेचा दुटप्पीपणा आणि मोदींचे मौन प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारतासारख्या देशांनी स्वस्त रशियन कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्यामुळे अमेरिका 100 टक्के पर्यंत आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याची धमकी देत आहे. परंतु, दुसरीकडे अमेरिकेच्या स्वतःच्या अणुऊर्जा उद्योगासाठी आवश्यक असलेल्या रशियन ‘लो-एनरिच्ड युरेनियम’च्या आयतीला मात्र अमेरिकन कायद्यातून स्पष्ट सूट देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना आपला “प्रिय मित्र” मानतात, तरीही अमेरिका भारताला आपल्या तालावर नाचवत मालकासारखी वागणूक देत आहे. नक्की कसल्या भीतीपोटी मोदी गप्प आहेत, असा टोला त्यांनी लगावला. “अमेरिका चीनला घाबरते, भारताला गुलाम समजते!” चीनच्या मुद्द्यावरून अमेरिकेच्या धोरणावर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “चीन हा भारतापेक्षा कितीतरी पटीने जास्त रशियन तेलाची खरेदी करतो, तरीही अमेरिकेने केवळ भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादले. चीन प्रत्युत्तरा दाखल कारवाई करेल या भीतीपोटी अमेरिकेने त्यांच्यावर हे टॅरिफ लावले नाही. यावरून हे स्पष्ट होते की, अमेरिका चीनला घाबरते आणि भारताला मात्र आपला ‘गुलाम’ समजते.” अमेरिकेकडे पंतप्रधान मोदींची गुपिते? शेवटी अत्यंत गंभीर आरोप करत प्रकाश आंबेडकर म्हणाले, “अमेरिकेकडे पंतप्रधान मोदींच्या काळ्या कारभाराची किंवा रहस्यांची संपूर्ण फाईल आहे का? याच भीतीपोटी मोदींनी स्वतःला आणि देशाच्या आर्थिक हितांना अमेरिकेसमोर सरेंडर केले आहे. आपली काळी रहस्ये लपवण्यासाठी ते भारताला पुन्हा एकदा एका परदेशी ताकदीचा गुलाम बनवत आहेत,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
Source link
‘अमेरिकेसमोर मोदी सरकारचे सरेंडर!’:रशियन तेलावरून भारतावर दबाव, मग स्वतःच्या युरेनियम आयातीला सूट का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल