![]()
पुण्यातील गणेशोत्सवात धार्मिक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत. यंदा गुलटेकडी मार्केट यार्डमधील श्री शारदा गजानन मंडळाने गणपतीची आकर्षक आरास साकारली आहे. यासाठी विविध प्रकारची फळे, भाजीपाला, पालेभाज्या आणि कंदमुळे वापरण्यात आली आहेत. या माध्यमातून नैसर्गिक गोष्टींचा वापर करून आकर्षक आरास कशी करते येऊ शकते हे दाखवण्यात आले आहे. मार्केट यार्ड हे पुणे शहरातील फळे आणि भाजीपाल्याचे मोठे केंद्र आहे. या परिसराची ओळख जपण्यासाठी मंडळाने सजावटीत भाजीपाल्याचा कल्पक वापर केला आहे. यात पालेभाज्या, मुळा, गाजर, मिरची, वांगी, टोमॅटो, काकडी, भोपळा, तसेच इतर फळे आणि कंदमुळांचा समावेश आहे. या कलात्मक मांडणीमुळे गणपतीचा परिसर भाविकांसाठी खास आकर्षण बनला आहे. या आरासीतून मंडळाने एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. बळीराजाच्या कष्टातून आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या शेतमालाचे महत्त्व समाजाला कळावे, तसेच शेतकरी, व्यापारी, कामगार आणि ग्राहक यांच्यातील नाते अधिक दृढ व्हावे, असा मंडळाचा उद्देश आहे. श्री शारदा गजानन मंडळाने यापूर्वीही गणेशोत्सवाद्वारे सामाजिक बांधिलकी जपली आहे. टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात मंडळाने पुढाकार घेतला होता. यामुळे लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीचा ताण कमी झाला. मंडळ आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि इतर सामाजिक उपक्रमही राबवते. मंडळ मार्केट यार्ड परिसरातील व्यापारी, माथाडी कामगार आणि नागरिकांना एकत्र आणून सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देत आहे. परंपरा, पर्यावरण, शेती आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम साधणारी यंदाची भाजीपाल्याची आरास पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.
Source link
गुलटेकडीत भाजीपाला-फळांपासून साकारली गणपतीची आकर्षक आरास:श्री शारदा गजानन मंडळाचा अभिनव देखावा; सामाजिक उपक्रमांची परंपराही कायम