![]()
कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळामुळे २८ वर्षांपूर्वीच्या घटनेची चर्चा होत आहे. १९९६-९७ साली झालेल्या वार्षिक सभेत संचालकांना चप्पला आणि लाडू फेकून मारण्यात आल्याने ती सभा कारखान्याच्या आतापर्यंतची सर्वाधिक वादळी सभा म्हणावी लागेल. २८ वर्षांपूर्वी झालेली वादळी सभा सह्याद्री कारखान्याचे चेअरमन, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि भाजपचे आमदार मनोज घोरपडे, विधान परिषदेचे आमदार धैर्यशील कदम यांचे समर्थक वार्षिक सभेत आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला. आजचा दिवस सह्याद्री कारखान्याच्या इतिहासातील सर्वात काळाकुट्ट दिवस असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब पाटील यांनी भर सभेत दिली. तथापि, सह्याद्री कारखान्याच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात वादळी सभा ही १९९६-९७ साली झाली होती. सह्याद्री विकास प्रतिष्ठानची स्थापना कॉंग्रेस एकसंघ असताना सह्याद्री कारखाना कार्यक्षेत्रातील विरोधकांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सह्याद्री विकास प्रतिष्ठान स्थापन केले होते. सांगली जिल्ह्यातील कडेपूरचे दिवंगत लालासाहेब यादव, कराड तालुक्यातील सदापूरचे आनंदराव जाधव, विठ्ठलराव जाधव, कोपर्डे हवेलीचे हिंदुराव चव्हाण, अशोकराव पाटील-शिरगावकर यांच्या बरोबरच कराड पंचायत समितीचे माजी सभापती मारूतराव थोरात, जि. प. चे माजी शिक्षण सभापती पतंगराव माने, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित पाटील-चिखलीकर, निवृत्ती काळभोर, सह्याद्री कारखान्याचे माजी संचालक निवासराव पाटील, लालासाहेब पाटील, मारूतीशेठ जाधव, शहाजी देशमुख या दिग्गजांचा प्रतिष्ठानमध्ये समावेश होता. उसाच्या बिलावरून सभेत राडा सह्याद्री कारखान्याचे संस्थापक चेअरमन दिवंगत पी. डी. पाटील यांनी चेअरमन पद सोडल्यानंतर बाळासाहेब पाटील चेअरमन झाले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली १९९७ साली झालेल्या वार्षिक सभेत ऊस बिलावरून मोठा गदारोळ झाला होता. ताळेबंदात दाखवलेल्या ऊसदरानुसार बील मिळालेले नाही. ६० रूपयांनी कमी बील मिळाले असल्याचा आरोप करत सह्याद्री प्रतिष्ठानच्या समर्थकांनी चिवड्याच्या पुड्यातील लाडू आणि चपला संचालकांना फेकून मारल्या होत्या. ऊस बिलाचा वाद गेला होता हायकोर्टात वार्षिक सभेत गोंधळ झाल्यानंतर सभा गुंडाळण्यात आली. त्यानंतर सह्याद्री विकास प्रतिष्ठानच्या वतीने मारूतराव थोरात यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. द्विसदस्यीय पीठाने पंधराच दिवसात निकाल देताना ६० रूपयांनी सभासदांना व्याजासह बील अदा करण्याचा आदेश सह्याद्री कारखान्याला दिला होता. त्यानंतर सह्याद्री विकास प्रतिष्ठान निवडणुकीच्या तयारीला लागले होते. कार्यक्षेत्रात प्रतिष्ठानला मोठा पाठिंबा मिळत होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत सत्तांतर घडविण्यात प्रतिष्ठान अपयशी ठरले होते. ठिकाण तेच, फक्त विरोधक बदलले काराखान्याच्या निवडणुकीत अपयश आल्यानंतर सह्याद्री प्रतिष्ठानचं कामही थंडावलं. दोनच वर्षात कॉंग्रेसमधून बाहेर पडत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील राष्ट्रवादी सोबत गेले. १९९९ घ्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले. सह्याद्री विकास प्रतिष्ठानही ॲक्टिव्ह राहिले नाही. त्यांचाही विरोध मावळत गेला. कालांतराने काही नेते देखील काळाच्या पडद्याआड गेले. आता तर विरोधातील बरेच जण सत्ताधाऱ्यांकडे आले आहेत. कालच्या सभेचे वर्णन करायचे तर ठिकाण तेच, सभा तीच फक्त विरोधातील चेहरे बदलले आहेत. भाजप नेत्यांचा विरोध नेमका कशासाठी? सह्याद्री सहकारी साखर कारखाना कराड उत्तर विधानसभा मतदार संघात आहे. या मतदार संघातून मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांनी दोनवेळा बाळासाहेब पाटील यांना आव्हान दिले होते. परंतु, दोन्हीवेळा त्यांचा पराभव झाला. २०२४ ला मनोज घोरपडे यांच्याकडून बाळासाहेब पाटील पराभूत झाले. घोरपडे-कदम हे कारखाना कार्यक्षेत्रातीलच आहेत परंतु, त्यांनीही आपले खासगी कारखाने उभे केले आहेत. त्यांच्या कारखान्यांनी पूर्ण ऊस बिल अदा केले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. त्यामुळे एक बोट सह्याद्रीकडे आणि चार बोटं स्वतःकडे, अशी विरोधकांची अवस्था आहे.
Source link
सह्याद्री कारखान्याच्या सभेत पुन्हा गदारोळ:28 वर्षांपूर्वीच्या 'त्या' लाडू आणि चप्पलफेक सभेची चर्चा, काय आहे नेमके प्रकरण?