Headlines

‘पत्र देऊन जागे होणारे असंवेदनशील मुख्यमंत्री नाहीत’:पवारांच्या पत्रावर चंद्रकांत पाटलांचा टोला, ‘मुख्यमंत्री संवेदनशील, स्वतःहून निर्णय घेणारे’




राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप पिकांचे नुकसान होत असून शेतकरी, शेतमजूर आणि पशुधनासमोरही अडचणी निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पवार यांनी पत्रातून राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कर्जमाफी आणि पीक विम्याबाबत विविध मागण्या केल्या आहेत. दरम्यान, पवारांच्या या पत्रावर भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सरकारच्या कार्यपद्धतीचा बचाव केला. ‘पत्र दिल्यानंतरच मुख्यमंत्री जागे होतील, असे ते असंवेदनशील मुख्यमंत्री नाहीत. ते संवेदनशील मुख्यमंत्री आहेत,’ असा टोला पाटील यांनी लगावला. ते सांगली येथे बोलत होते. ‘मुख्यमंत्री स्वतःहून निर्णय घेणारे’ चंद्रकांत पाटील म्हणाले की, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले याचे एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपण स्वागत करतो. मात्र, सरकारने एखाद्या नेत्याच्या पत्राची वाट पाहून काम सुरू केलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परिस्थितीची दखल घेऊन स्वतःहून निर्णय घेणारे आहेत, असा दावा त्यांनी केला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारकडून आधीच काही उपाययोजना सुरू असल्याचेही पाटील यांनी सांगितले. पाणीटंचाईच्या भागात टँकर सुरू करण्यात आले आहेत का, तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी उपाययोजना होत आहेत का, याकडे त्यांनी लक्ष वेधले. चारा उपलब्धतेसाठी बियाणे वाटपाची प्रक्रिया थांबवण्यात आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘कर्नाटकात नेमकं काय झालं, ते सांगा’ दरम्यान, विरोधकांकडून महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर केला, मग महाराष्ट्र सरकारकडून तशी घोषणा का होत नाही, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा अभ्यास करण्याची भूमिका मांडली. कर्नाटक हे देखील नियमांनुसार चालणारे राज्य आहे. त्यामुळे तेथे दुष्काळ जाहीर करण्यापूर्वी कोणती प्रक्रिया आणि कोणते निकष वापरण्यात आले, याची माहिती विरोधकांनी सरकारच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘कर्नाटकात जे काही चालले आहे ते आमच्या निदर्शनास आणून द्या. त्यांनी नियमाप्रमाणे आधी काय केले, याचा अभ्यास करू,’ असे पाटील यांनी स्पष्ट केले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एकीकडे पवारांकडून तातडीने दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची मागणी होत आहे, तर सरकारकडून दुष्काळी स्थितीचे मूल्यांकन आणि नियमांनुसार आवश्यक उपाययोजना करण्याची भूमिका मांडली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सरकारने पंचनामे आणि मदत प्रक्रियेबाबत पावले उचलल्याचे म्हटले आहे. हेही वाचा… राहुल गांधींनी स्टँडअप कॉमेडियन बनावे:तिथे मिमिक्री केल्यास किमान रोजगार तरी मिळेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील अवाडा (Avaada) सोलर प्रकल्पाला भेट दिल्यानंतर विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिमिक्रीवर टीका करताना, नागपुरातील उद्योगवाढ, अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रांची उभारणी, मुंबईतील पायाभूत सुविधा, समृद्धी महामार्गालगत प्रस्तावित फ्रेट कॉरिडोर तसेच UPI व्यवहारांवरील शुल्क या मुद्द्यांवरही सविस्तर भूमिका मांडली. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *