Headlines

सोलापूर जिल्हा बँक भाजप स्वबळावर जिंकणार:मंत्री जयकुमार गोरेंना विजयाचा विश्वास, पुणे पदवीधरबाबतही मोठे विधान




सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढत्या दौऱ्यांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले आहे की, भारतीय जनता पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढून जिंकेल, तसेच जे समविचारी सोबत येतील त्यांनाही सामावून घेतले जाईल. जिल्ह्यातील भाजपचे सक्षम नेते एकत्र बसून या निवडणुकीची रणनीती ठरवतील आणि त्यानुसारच पुढील नियोजन होईल. शासनाचा प्रतिनिधी व पालकमंत्री या नात्याने, भाजप स्वबळावर जिल्हा बँकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवेल, असा ठाम विश्वास जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीचे वेध लागले असून, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक महायुती म्हणून लढवून जिंकणारच, असा ठाम दावा केला आहे. मागील निवडणुकीत या दोन्ही जागांवर भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, त्यातून सावरत पक्षाने यावेळी मतदार नोंदणीपासूनच जोरदार तयारी केली आहे. सध्या ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचे नियोजन असले तरी, ऐनवेळी पक्षाने निर्णय घेतल्यास भाजप स्वबळावरही या दोन्ही मतदारसंघांत निवडणूक लढवून विजय मिळवेल, असा विश्वासही गोरे यांनी व्यक्त केला आहे. पुढचे संपूर्ण वर्ष सोलापूर जिल्ह्याला केवळ उजनी धरणाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार असल्याने, या पाण्याचे अत्यंत काटेकोरपणे नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले आहे. आज सप्टेंबर महिन्यातही जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून, पुढील वर्षभराची संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी उजनीतील प्रत्येक थेंबाचे योग्य नियोजन केल्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या नियोजनांतर्गत पाण्याचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला असून, सर्वात आधी नागरिकांना वर्षभर लागणारे पिण्याचे पाणी आणि त्यानंतर जनावरांच्या पाण्यासाठी आरक्षण करावे लागणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या गरजा पूर्ण केल्यानंतरच उर्वरित पाणी शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाईल, जेणेकरून संपूर्ण वर्षभर जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई भासणार नाही, अशी माहिती जयकुमार गोरे यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *