Headlines

तुमच्या नंबरवरून अश्लील फोटो गेलेत!:अटकेची भीती दाखवून पुण्यातील ज्येष्ठाला 19 लाखांचा गंडा, चंदननगर पोलिसांकडून गुन्हा दाखल




पुण्यात अटकेची भीती दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची 19 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. सायबर चोरट्यांनी वडगाव शेरी भागातील 75 वर्षीय नागरिकाला लक्ष्य केले. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी स्वतःला नाशिकमधील पंचवटी पोलिस ठाण्याचे अधिकारी असल्याचे सांगितले. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाला सांगितले की, त्यांच्या मोबाइल क्रमांकावरून लोकांना अश्लील फोटो पाठवले गेले आहेत. या प्रकरणात त्यांना अटक केली जाईल, अशी भीती दाखवली. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, असेही सांगितले. त्यानंतर चोरट्याने ज्येष्ठाच्या बँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करून त्यांच्या खात्यातून 19 लाख 20 हजार रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले. आपल्या खात्यातून पैसे गायब झाल्याचे लक्षात आल्यावर ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक एन. जगताप या प्रकरणाचा तपास करत आहेत. खरेदीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक दुसऱ्या एका घटनेत, खरेदीच्या बहाण्याने एका महिलेने सराफी दुकानातून 95 हजार रुपयांचे दागिने चोरल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली आहे. सराफी दुकानाच्या मालकाने खडकी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बुरखा घातलेली एक महिला दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आली होती. तिने कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतवले.कर्मचाऱ्याचे लक्ष नसताना, महिलेने प्लास्टिक ट्रेमधील जोडवी आणि सोन्याची कर्णफुले असा 95 हजार रुपयांचा ऐवज चोरला. चोरीची ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक पटेल या प्रकरणाचा तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *