![]()
रांजणगाव पोळ (ता. गंगापूर) येथील लघुप्रकल्पातील धरणाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढल्याने धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत ‘दिव्य मराठी’ने ३१ ऑगस्ट रोजी ‘रांजणगावचा लघुप्रकल्प; भिंतीला झुडपांचा विळखा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता सुदर्शन तुवर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अखेर धरणाच्या भिंतीवरील झाडे व झुडपे काढण्याच्या कामाला रविवारी प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. येत्या पंधरवड्यात भिंत धरणाखालील परिसरात झाडेझुडपे काढण्यात येणार आल्याचे तुवर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. धरणाच्या भिंतीवर वाढलेल्या झाडांच्या मुळांमुळे भिंतीच्या संरचनेला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे भिंतीची स्वच्छता करून आवश्यक दुरुस्ती व देखभाल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. प्रशासनाकडून आता मशिनरीच्या साहाय्याने भिंतीवरील झाडेझुडपे हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे धरणाची भिंत मोकळी होऊन तिची पाहणी व आवश्यक दुरुस्ती करणे सुलभ होणार आहे. ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताची दखल घेऊन कार्यवाही केल्याने माजी सरपंच रावसाहेब बोडखेंसह ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.
Source link
रांजणगाव पोळ लघुप्रकल्पाच्या भिंतीवरील झाडे काढण्यास सुरुवात:मशिनरीच्या साहाय्याने काम सुरू; धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी