![]()
सोयगाव शहरातील जुना बाजार चौक येथील पोलिस ठाण्याची जुनी इमारत आता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगात आणली जाणार आहे. कॉलेज रोडवरील नवीन इमारतीत पोलिस ठाणे स्थलांतरित झाल्याने जुनी इमारत अनेक दिवसांपासून वापराविना पडून होती. य
.
सोयगाव शहर व परिसरात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र अभ्यासिका उपलब्ध नसल्याने पोलिस भरती, सैन्य भरती तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. जुने पोलिस ठाणे अभ्यासिकेसाठी वापरता येऊ शकते, अशी सूचना काही नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली होती.
पोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली होती. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजित कोईगंडे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास, व्यायाम व स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे महत्त्व सांगत गावपातळीवर अशा सुविधा निर्माण करण्यासाठी पोलिस प्रशासन पुढाकार घेईल, असे स्पष्ट केले होते.
त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांनी स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांसह जुना पोलिस ठाणे परिसराची पाहणी केली. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या खोल्यांची आवश्यक दुरुस्ती करून त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सोयगावातून अधिकारी, कर्मचारी घडावेत सोयगाव शहरातील मुलांना स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळावे आणि अभ्यासासाठी सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांच्या सहकार्याने पोलिस अभ्यासिका सुरू करत आहोत. यासाठी जुना पोलिस ठाण्याची जागा वापरण्यात येणार आहे. सोयगावातून अधिकारी घडावेत, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. -दिनकर गोरे, सपोनि, सोयगाव.