![]()
ढोल-ताशांचा निनाद, मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणात यंदा मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात पुणेकर कला, संस्कृती आणि आधुनिक पुण्याची स्पंदने अनुभवत आहेत. १३४ वर्षांची परंपरा जपताना, काळाबरोबर बदलणाऱ्या पुण्याचा चेहराही या उत्सवात दिसतो आहे. यंदाच्या कार्यक्रमांचा नजराणा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला आहे. गणरायाच्या दर्शनानंतर यंदा कसबा गणपतीच्या उत्सवात वाराणसीच्या घाटांवरील आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव मिळत आहे. वाराणसीमध्ये प्रत्यक्ष गंगा आरती करणाऱ्या व्यक्तींकडून ही आरती सादर केली जाते. दिव्यांच्या प्रकाशात, मंत्रघोषात आणि भक्तिमय वातावरणात होणारी ही आरती गणेशोत्सवातील एक अविस्मरणीय अनुभव ठरली आहे. पुण्याच्या बदलत्या ओळखीचे प्रतीक असलेल्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचाही यंदाच्या उत्सवात खास सहभाग आहे. हिंजवडीतील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ सॉफ्टवेअर व्यावसायिकांची ‘आयटी दिंडी’ हा विशेष आकर्षणाचा कार्यक्रम ठरला. लॅपटॉप, कोडिंग आणि कॉर्पोरेट जगतात रमणारे हे तंत्रज्ञ गणरायाच्या चरणी पारंपरिक दिंडीच्या रूपात सहभागी झाले होते. पुण्याच्या जुन्या सांस्कृतिक मुळांचा आणि नव्या ‘आयटी पुण्या’चा हा अनोखा संगम पुणेकरांनी अनुभवला. यंदाच्या कार्यक्रमांमध्ये विविध कलाप्रकारांचा अनोखा मेळ पाहायला मिळाला. ओडिसी नृत्य, शिववंदना, आफ्रिकन जेम्बे वादन आणि कुचिपुडी नृत्य असे कार्यक्रम झाले. यातून भारतीय तसेच जागतिक कलाविश्वाचे रंग गणेशोत्सवाच्या मंचावर दिसले. आफ्रिकन जेम्बेचा जोशपूर्ण ताल आणि भारतीय शास्त्रीय नृत्यांची लय एकाच उत्सवात अनुभवता आली. पुण्याच्या कलाविश्वाची वेगळी ओळख असलेल्या अर्बन स्केचर्स समूहाकडून गणरायाचे लाइव्ह स्केचिंग हा एक लक्षवेधी उपक्रम ठरला. गणेशमूर्तीसमोर बसून कलाकारांच्या कुंचल्यातून आणि रेषांमधून गणरायाचे रूप कागदावर साकारले जात होते. हे पाहून भक्तांमध्ये चैतन्याची लहर निर्माण झाली. नव्या कलाविष्कारांसोबतच कसबा गणपतीच्या उत्सवाची पारंपरिक ओळख यंदाही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. अथर्वशीर्ष, सत्यविनायक पूजा, विविध भजनी मंडळांची सेवा, कीर्तन, आरत्या आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कविसंमेलन असे पारंपरिक कार्यक्रम झाले. यामुळे उत्सवाला भक्ती आणि संस्कृतीची समृद्ध किनार मिळाली आहे. पुणे शहराच्या गेल्या काही दशकांतील विस्तारामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांतून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येथे आले आहेत. या नागरिकांनी शहराच्या संस्कृतीत नवे रंग मिसळले आहेत. या नव्या पुण्याच्या सांस्कृतिक आवडी-निवडींना पारंपरिक पुण्याच्या वारशाशी जोडण्याचा प्रयत्न यंदाच्या कार्यक्रमांमधून दिसतो.
Source link
कसबा गणपतीचा 134 वर्षांचा उत्सव, यंदा नव्या सांस्कृतिक रूपात:वाराणसीची गंगा आरती, आयटी दिंडीसह अनेक कलाविष्कार पुणेकर अनुभवत आहेत