Headlines

ध्वनी प्रदूषणावर कठोर कारवाईची विद्यानंद बापट यांची मागणी:गणेशोत्सवात नियमांचे उल्लंघन; 'तुमचा आनंद म्हणजे इतरांना शिक्षा' असा उत्सव नको




गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणाचे नियम सर्रास मोडले जात आहेत. वेळेच्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. ‘तुमचा आनंद म्हणजे इतरांना शिक्षा’ असा उत्सव नागरिकांवर लादला जाऊ नये, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी पत्रकार परिषदेत मांडली. ध्वनी प्रदूषणाची समस्या केवळ उत्सवापुरती न ठेवता ती मुळापासून सोडवण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. ध्वनी प्रदूषणाच्या प्रश्नावर न्यायालयाने स्वतःहून दखल घेतल्याचे बापट यांनी स्वागत केले. याआधी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरही अशाच प्रकारे न्यायालयाने दखल घेतली होती. त्यातून काही चांगले निर्णय झाले होते. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाच्या प्रश्नावरही ठोस आणि प्रभावी निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गेल्या आठ दिवसांतील परिस्थिती समाधानकारक नाही, असा दावा बापट यांनी केला. त्यांनी स्वतः ११२ क्रमांकावर फोन करून ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रारी केल्या आहेत. काल आणि परवा रात्रीही त्यांनी तक्रारी केल्याचे सांगितले. तरीही, नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. उत्सव काळात मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त लावला जातो. मात्र, त्यातून ध्वनी प्रदूषणाच्या प्रश्नावर हवा तसा परिणाम साधला जात नाही, असा आरोप बापट यांनी केला. पोलिस बंदोबस्तासाठी होणारा सार्वजनिक निधीचा खर्च करदात्यांच्या पैशातून होतो. त्यामुळे त्याची जबाबदारी उत्सव आयोजकांवर निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. सुमारे १५० मंडळांना आधी परवानगी नाकारली होती, पण त्यांना पुन्हा परवानगी देण्यात आली. या मुद्द्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मिरवणुकांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, त्यांनी रस्त्यावर एक सेकंदही अडथळा निर्माण करू नये. शहराबाहेर एखादा वेगळा मार्ग मिरवणुकांसाठी उपलब्ध करून देता येईल, अशी भूमिका बापट यांनी मांडली. उत्सव साजरा करणे ही काही जीवनावश्यक गोष्ट नाही. त्यामुळे नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या प्रथा आता बंद करण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *