Headlines

करमाळ्यात महिला सुरक्षा अन् कायद्याबाबत पथनाट्यातून जागर, करमाळ्याचा राजा गणेशोत्सव मंडळ व निर्भया पथकाकडून सादरीकरण‎




महिला व मुलींनी संकटाच्या प्रसंगी कोणती काळजी घ्यावी, छेडछाड व महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क कसा साधावा, यासाठीचे असणारे हेल्पलाइन नंबर देण्यात आले. तसेच उपलब्ध कायदेशीर मदत व सुरक्षा यंत्रणांचा वापर कसा करावा, महिला व मुलींनी भीती न बाळगता अन्याया विरोधात आवाज उठवावा, संशयास्पद अथवा त्रासदायक प्रकारांची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असा संदेश पथनाट्यातून देण्यात आला. महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने करमाळा निर्भया पथक व करमाळाचा राजा गणेशोत्सव मंडळ, राशीन पेठ, करमाळा यांच्या विद्यमाने करमाळा शहरातील विविध ठिकाणी निर्भया पथक या विषयावर प्रभावी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा बसस्थानक, कन्या प्रशाला, ग्लोबल सायन्स, भवानी नाका तसेच सुभाष चौक आदी ठिकाणी पथनाट्य सादर केले. या कार्यक्रमास सहायक पोलिस निरीक्षक अंजना कृष्णा, सहायक पोलिस निरीक्षक भैरवनाथ पाटील, पोलिस उपनिरीक्षक अतुल विटुकडे, पोलिस हवालदार मंगेश पवार, संभाजी पवार, गणेश गुटाळ तसेच महिला पोलिस अंमलदार विद्या इंगोले उपस्थित होते. तसेच यावेळी राशीन पेठ तरुण मंडळाचे कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक आणि महिला उपस्थित होते.पथनाट्याच्या माध्यमातून महिला व मुलींना त्यांच्या हक्कांबाबत तसेच उपलब्ध सुरक्षा उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता प्रसंगावधान राखणे, मदतीसाठी तत्काळ संपर्क साधणे आणि घटनांची माहिती पोलिसांना देणे याबाबत प्रात्यक्षिक स्वरूपात संदेश देण्यात आला. पथनाट्यातील प्रभावी संवाद, प्रसंग आणि सादरीकरणामुळे उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले गेले. महिला सुरक्षा केवळ पोलिसांची नव्हे, तर समाजाची जबाबदारी महिला व मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासोबतच समाजातील प्रत्येक घटकाने महिलांच्या सन्मान व सुरक्षिततेसाठी पुढाकार घ्यावा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक जनजागृतीचा उपक्रम राबवला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *