![]()
गणेशोत्सवाच्या पावन वातावरणात केवळ धार्मिक भक्तीचाच नव्हे, तर समाजाला नवी दिशा देणाऱ्या विचारांचा जागर पैठण शहरात पाहायला मिळत आहे. पैठण येथील कला शिक्षक गणेश गोजरे यांनी यंदा आपल्या घरगुती गणपतीसमोर आकर्षक, आशयघन आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक देखावा साकारला आहे. ‘मुलगा असो वा मुलगी, शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क’ हा पायाभूत संदेश देणारा हा देखावा परिसरात गणेशभक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. दशकभरापासून गणेशोत्सवाचे औचित्य साधून केवळ देखावे न उभे करता त्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन करण्याची गोजरे यांची अनोखी परंपरा आहे. यंदा त्यांनी समाजविकासाचा मुख्य आधार असलेल्या ‘शिक्षणाचा अधिकार आणि मुला-मुलींना समान संधी’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून देखाव्याची आखणी केली आहे. मूर्तीभोवती विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित प्रतीकात्मक साहित्याची रचना करण्यात आली आहे. बाप्पाच्या दोन्ही बाजूंना शाळा गणवेशातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे कटआऊट्स उभारले आहेत. मुलगा-मुलगी भेद दूर करून दोघांनाही गुणवत्तेचे शिक्षण मिळायला हवे विचार मांडला आहे. पूर्णपणे प्लास्टिकमुक्त व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून साकारलेल्या देखाव्यात कलात्मकता आणि सामाजिक बांधिलकीचा मेळ पाहायला मिळतो. बाप्पाच्या दर्शनासाठी येणारे नागरिक व भाविक केवळ धार्मिक अनुभूती घेऊन न परतता ‘शिक्षण सर्वांसाठी’ हा विचारही मनात रुजवून जात आहेत. “मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येक बालकाला शिक्षणाची समान आणि गुणवत्तापूर्ण संधी मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. शिक्षणामुळे केवळ एका व्यक्तीचा विकास होत नाही, तर संपूर्ण कुटुंब आणि पर्यायाने समाजाची प्रगती होते. ज्ञानाचा हा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचला तरच आपल्या समाजाची उन्नती साध्य होणार असल्याचे गणेश गोजरे म्हणाले. शिक्षणामुळे कुटुंबासह समाजाची प्रगती
Source link
पैठणला गणरायाच्या साक्षीने शिक्षणाचा जागर:कला शिक्षक गणेश गोजरे यांच्याकडून बाप्पाच्या चरणी ज्ञानाचा जागर