![]()
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाला सामाजिक व राष्ट्रीय प्रबोधनाचे स्वरूप देत समाजाला संघटित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. आजच्या युवकांनीही गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम आणि विधायक विचारांची जोपासना करावी, असे प्रतिपादन प्रवचनकार तथा लायन्स क्लब झोन चेअरमन प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी (सोलापूर) यांनी केले. अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगीज महाविद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्था यांच्या विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त आयोजित ‘बौद्धिक व्याख्यानमाला’ अंतर्गत चौथे व्याख्यानात ‘टिळकांच्या गणेशोत्सवातून युवकांना प्रबोधन’ या विषयावर प्रा. कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सुभाष धरणे होते. या वेळी कलशेट्टी म्हणाले, वाचन संस्कृती रुजविण्याची गरज व्यक्त करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासोबत अवांतर वाचनाची गोडी जोपासावी, असे आवाहन केले. टिळकांसारख्या थोर महापुरुषांचा इतिहास व विचार समजून घेण्यासाठी सोशल मीडियापेक्षा सार्वजनिक वाचनालयांची भूमिका महत्त्वाची आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकवर्गणीतून जमा होणारा निधी केवळ अनावश्यक मिरवणुकीवर खर्च न करता समाजहिताच्या विधायक उपक्रमांसाठी वापरणे अधिक उपयुक्त ठरेल. अध्यक्षीय मनोगतातून भरमशेट्टी यांनी बौद्धिक व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, सामाजिक व वैचारिक विषयांची माहिती मिळत असून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत आहे. यावेळी प्रा. दयानंद कोरे, कर्मचारी रमेश पुजारी, बुद्धीबळ व कुस्ती स्पर्धेत यश मिळविलेले विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आले. प्रास्ताविक भाषण सचिव दत्तात्रय होटकर यांनी केले.परिचय डॉ. विठ्ठल वाघमारे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन सृष्टी दिंडोरे हिने केले. आभार प्रा. विजया कोन्हाळी यांनी केले. युवकांनी महापुरुषांचे कार्य समजून घ्यावे प्रा. कलशेट्टी पुढे म्हणाले, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजजागृती, सामाजिक एकजूट आणि राष्ट्रीय भावना जागृत करणारे प्रभावी माध्यम ठरले आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनतेमध्ये स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे कार्य केले. त्यामुळे आजच्या युवकांनी महापुरुषांचे विचार व कार्य समजून घेऊन सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.
Source link
टिळकांच्या गणेशोत्सवातून युवकांना प्रबोधनाची गरज:खेडगीज महाविद्यालयातील व्याख्यानात प्रा. कलशेट्टी यांचे प्रतिपादन