![]()
विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नुकत्याच झालेल्या मराठवाडा दौऱ्याची जोरदार खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा म्हणजे ‘मेरी आवाज सुनो’ हा चित्रपट असल्याची टीका त्यांनी केली आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक प्रहार करतानाच, दुसरीकडे दानवे यांनी वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची थेट बांधावर जाऊन पाहणी केली आणि अटी-शर्तींविना शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची आक्रमक मागणी राज्य सरकारकडे केली आहे. ‘मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे चित्रपट’ अंबादास दानवे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली. “कालचा मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा म्हणजे जणू ‘मेरी आवाज सुनो’ हा चित्रपटच होता! शेतकऱ्यांचा आवाज ऐकायचा नाही आणि आपलंच कीर्तन रेटायचं, अशी या चित्रपटातील नायकाची कथा होती. ताफ्यातील एक आघाडीचा व्हिलन शेतकऱ्यांना धक्के मारून लोटत सुटला होता, तर दुसऱ्या एकाला हे पाहून दया येत असली तरी तो दात काढलेल्या वाघासारखा अपमान गिळून मुकाट उभा होता,” असा टोला दानवे यांनी लगावला. या राजकीय नाट्याचे वर्णन करताना ते पुढे म्हणाले, “या चित्रपटात लोकांना मंत्रालयात चक्रव्यूह रचणारा ‘अभिमन्यू’ही दिसला आणि तलवार काढून घेतलेला ‘सरनाईक’ही अधूनमधून झळकला. पण, ‘मराठवाड्यातील या पिढीने दुष्काळ बघितला, पुढची पिढी दुष्काळ बघणार नाही!’ हा मुख्य डायलॉग मात्र या चित्रपटातून गायब होता,” असा घणाघात त्यांनी केला. वाशिममध्ये पिकांची पाहणी दरम्यान, अंबादास दानवे यांनी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील शिरपूर आणि मांगवाडी येथे जाऊन शेतपिकांची पाहणी केली. पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने डोळ्यांसमोर उभी केलेली पिके हातातून जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. प्रत्यक्ष बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कष्ट, खर्च आणि मेहनत करून उभे केलेले पीक वाया जाताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसणारी चिंता त्यांनी अधोरेखित केली. ‘पंचनाम्यांच्या भूलभुलैयात अडकवू नका’ “ही केवळ पिकांची हानी नसून, शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टांवर आलेले हे मोठे संकट आहे,” असे दानवे म्हणाले. सरकारने केवळ कागदोपत्री घोषणा न करता, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून परिस्थिती पाहावी आणि तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. “मदतीसाठी तारीख, पंचनामे आणि अटी-शर्तींच्या भूलभुलैयात शेतकऱ्यांना अडकवू नका. या संकटाच्या काळात सरकारने खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे,” असा इशाराही अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला दिला आहे. हेही वाचा.. पैसेवारीपासून उपग्रहापर्यंत मदतीचे निकष बदलले:पण मदत तुटपुंजीच, मृदा आर्द्रता, भूजल, उपग्रह आणि पीक नुकसानीवर निर्णय महाराष्ट्राच्या स्थापनेपासून गेल्या ६६ वर्षांत दुष्काळाची कारणे बदलली नाहीत; मात्र दुष्काळ ओळखण्याची भाषा आणि मदतीची पद्धत आमूलाग्र बदलली. सुरुवातीच्या काळात पाऊस, पीकस्थिती, पैसेवारी आणि महसुली नोंदींवर टंचाई ठरवली जात होती. दुष्काळ पडला की टंचाईची कामे, महसूलमाफी, तगाई, अन्नधान्य आणि पाणीपुरवठा ही मदतीची प्रमुख साधने होती. १९७२ च्या भीषण दुष्काळाने रोजगाराच्या कामांना मोठे महत्त्व दिले आणि पुढे १९७७ च्या महाराष्ट्र रोजगार हमी कायद्याने त्याला संस्थात्मक रूप मिळाले. सविस्तर वाचा
Source link