![]()
मविप्र समाज संचलित गणूर येथील होरायझन अकॅडमीत गुरुवारी (दि. २४) ‘ग्रँडपॅरेंट्स डे’ (आजी-आजोबा दिन) उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित आजी-आजोबांना शाळेतर्फे फळझाडांची भेट देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. परिसरातील आजी-आजोबा नातवंडांसह या सोहळ्यात सहभागी झाले. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या पूजनाने झाली. उपस्थित आजी-आजोबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्त्री शक्तीचा सन्मान करत मविप्र संस्थेच्या सभासद सत्यभामा अणाजी कासव आणि अनिता आनंदराव पवार यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली. यावेळी आजी-आजोबांनी नातवंडांसोबतचे जिव्हाळ्याचे अनुभव व्यक्त केले. शाळेचे प्राचार्य मंगेश कदम यांनी लहान मुले अनुकरणप्रिय असल्याने आजी-आजोबा व पालकांनी नातवंडांसमोर व्यसन करू नये आणि अर्वाच्य भाषा वापरू नये, असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत उपस्थित आजी-आजोबा व पालकांनी ‘आम्ही मुलांसमोर व्यसन करणार नाही’, अशी ग्वाही दिली. आजी-आजोबांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. रॅम्प वॉकमध्ये ग्रामीण भागातील आजी-आजोबांनी सहभाग घेतला. आजोबांनी आजींना गुलाबपुष्प देत भावना व्यक्त केल्या. सोहळा यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Source link
व्यसन न करण्याची आजी-आजोबांची ग्वाही:गणूर येथील मविप्रच्या होरायझन अकॅडमीत रंगला ग्रँड पॅरेंट्स डे; फळझाडे देऊन केला सन्मान