Headlines

MPSC ड्रग्ज इन्स्पेक्टर पेपर घोटाळा:सांगोला, बुलढाणा अन् नवी मुंबईत SIT चे छापे; 2 उमेदवारांसह मध्यस्थांना बेड्या, आरोपींची संख्या 11 वर




महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक (गट-ब) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने धडक कारवाई करत आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. विशेष तपास पथकाने (SIT) विविध भागांत धाडी टाकून आणखी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये पेपर फोडणाऱ्या टोळीशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या दोन परीक्षार्थी उमेदवारांसह दोन महत्त्वाच्या मध्यस्थांचा समावेश आहे. या ताज्या अटकेमुळे एमपीएससीच्या या बहुचर्चित पेपरफुटी घोटाळ्यातील अटक आरोपींची एकूण संख्या आता थेट 11 वर पोहोचली असून, परीक्षा वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. सांगोला, बुलढाणा आणि नवी मुंबईतून चौघांना अटक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेपरफुटीचे धागेदोरे ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. परीक्षेपूर्वी फुटलेली प्रश्नपत्रिका बेकायदेशीरपणे मिळवणारा उमेदवार साजिद संदे याला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून, तर दुसरा उमेदवार विजय किंगर याला बुलढाणा येथून अटक करण्यात आली. नवी मुंबईतून दोन मध्यस्थ जेरबंद आरोपी संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम या दोघांना नवी मुंबई परिसरातून अटक करण्यात आली. हे दोघे मंत्रालयीन अधिकारी, रॅकेटचे मुख्य सूत्रधार आणि परीक्षार्थी उमेदवार यांच्यात कोट्यवधींच्या आर्थिक देवाणघेवाणीत मध्यस्थी (दलाल) म्हणून काम करत होते. गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) अन्न व औषध प्रशासनातील (FDA) ‘औषध निरीक्षक, गट-ब’ संवर्गातील १५४ रिक्त पदांसाठी २२ मार्च २०२६ रोजी राज्यभरातील ६ प्रमुख परीक्षा केंद्रांवर चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. आयोगाच्या अत्यंत सुरक्षित व गोपनीय मानल्या जाणाऱ्या परीक्षा कक्षातूनच प्रश्नसंच बाहेर काढण्यात आला. शासकीय पदाचा दुरुपयोग करून, परीक्षेच्या निष्पक्षतेला हरताळ फासत आर्थिक लाभासाठी हा प्रश्नसंच परीक्षेपूर्वीच ठरावीक उमेदवारांना लाखो रुपयांत विकण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासात उघड झाले होते. मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांसह आधीच 7 जण गजाआड या रॅकेटचा पर्दाफाश करताना गुन्हे शाखेने यापूर्वीच मंत्रालयीन यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मध्यस्थांना गजाआड केले आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्यांमध्ये: या सर्वांच्या सखोल चौकशीतून मिळालेल्या डिजिटल पुराव्यांच्या आणि व्हॉट्सॲप चॅट्सच्या आधारे सांगोला आणि बुलढाण्यातील संशयितांपर्यंत पोलीस पोहोचले. कठोर कायदे व गंभीर कलमांन्वये कारवाई या घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेने आरोपींविरोधात अत्यंत कठोर कलमांचा बडगा उगारला आहे. कलम ११२, ३१६ (४), ३१६ (५), ३१८ (४), ३२८ (ब), ३७१ (२), ३०३ (२), ६१ (२) आणि ३ (५). नव्याने लागू करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम, २०२४’ चे कलम १९ (९)(२)(३) आणि १२ (९)(२). शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याने ‘भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८’ मधील कलम १३ (२) व १३ (१) (अ) चाही गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे. आयोगातील आणखी काही कर्मचारी किंवा इतर खासगी स्पर्धा परीक्षा क्लासेसचे संचालक या रॅकेटशी जोडलेले आहेत का? तसेच या परीक्षेव्यतिरिक्त इतर परीक्षांचे पेपर फोडण्याचा प्रयत्न झाला होता का? या दिशेने गुन्हे शाखेची विशेष टीम कसून चौकशी करत आहे. —————- हेही वाचा…. सत्तेतील रेडे ‘ज्ञानेशा’कडून आपले वेद वदवून घेत आहेत: निवडणूक आयोगाच्या कारभारावरून राज ठाकरेंचा घणाघात निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि विशेषतः ‘एसआयआर’ (SIR) प्रणालीतील कथित घोळावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट करत भाजप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *