Headlines

धामणगावच्या विसर्जन मिरवणुकीत दुष्काळाचे फलक झळकले:‘दुष्काळ जाहीर करा’सह पाणी बचतीचे आवाहन




हिंगोली जिल्हयात धामणगाव (ता. वसमत) येथे गणेशमुर्ती विसर्जन मिरवणुकीत चिमुकल्यांसह तरुणांनी दुष्काळ जाहिर करण्याची मागणी करणारे फलक झळकविले या सोबतच नागरीकांनी पाणी वाचविण्याचे आवाहनही केले आहे. गावातून शुक्रवारी ता. २५ झालेल्या गणेशमुर्ती विसर्जन मिरवणुकीतूनही दुष्काळाची दाहकता दाखवून देण्यात आली आहे. हिंगोली जिल्हयात दुष्काळी परिस्थती असून पावसाचा मोठा ख्ंड पडल्याने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने केलेल्या पाहणीमध्येही हिंगोली जिल्हयात दुष्काळी परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रदिप कच्छवे यांनी या संदर्भातील अहवाल शासनाला पाठविला असून जिल्हयातील भिषण परिस्थिती मांडली आहे. दरम्यान, जिल्हयात दुष्काळसदृष्य परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ‘धामणगाव नगरीचा राजा सार्वजनिक गणेश मंडळ’ या मंडळाने अत्यंत साध्या पद्धतीने विसर्जन सोहळा साजरा केला. विसर्जन मिरवणुकीतील अनावश्यक खर्च टाळून या मंडळाने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. विसर्जन सोहळ्याच्या निमित्ताने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘पाणी वाचवा, झाडे जगवा’ असा महत्त्वाचा सामाजिक संदेश देत जनजागृती केली. तसेच, सध्याची बिकट परिस्थिती लक्षात घेता शासनाने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी देखील या विसर्जन प्रसंगी करण्यात आली. या मागणीचे फलकही चिमुकल्यांसह तरुणांच्या हाती झळकले. या फलकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात आली आहे. दरम्यान, कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी केलेल्या आवाहनाला आणि मार्गदर्शक सूचनांना पूर्णपणे प्रतिसाद देत, धामणगाव येथील सर्व गणेश मंडळांनी कायदा व सुव्यवस्था राखत अत्यंत शांततेत व सुरक्षित वातावरणात गणपती विसर्जन सोहळा पार पाडला. डीजे आणि भपकेबाज मिरवणुका टाळून गावकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले. कुरुंदा पोलीस प्रशासनाच्या नियमांचे पालन करत गावाने दाखवलेल्या या सामाजिक संवेदनशीलतेचे व सहकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *