![]()
औंढा नागनाथ येथे गणेशमुर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये नाचतांना भोवळ येऊन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ता. 26 घडली आहे. या घटनेमुळे मिरवणुकीवर दुःखाचे सावट होते. तर जिल्ह्यात डीजे लावणाऱ्या 14 गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंगोली शहरासह जिल्हाभरात शुक्रवारी (ता. 26) गणेशमुर्ती विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल ताशांच्या गजरात,गुलालांची उधळण करीत निघालेल्या मिरवणुका रात्री 12 वाजता संपल्या. शुक्रवारी सर्वत्र गणेशमुर्ती विसर्जन शांततेत पार पडले आहे. दरम्यान, औंढा नागनाथ येथे शुक्रवारी दुपारी गणेशमुर्ती विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. शहरातून वाजत गाजत निघालेली मिरवणुक सोनारगल्ली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आली होती. यावेळी मिरवणुकीत नाचत असतांना नागेश काशिनाथ वाघमारे (20 रा. टाकळी कुंभकर्ण, ह. मु. औंढा नागनाथ) या तरुणाला भोवळ आली अन तो रस्त्यावर कोसळला. सदर प्रकार त्या ठिकाणी असलेल्या गणेशभक्तांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नागेश यास तातडीने उपचारासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या घटनेमुळे गणेशमुर्ती विसर्जन मिरवणुकीवर दुःखाचे सावट निर्माण झाले. या घटनेनंतर विसर्जन मिरवणुका साधेपणाने काढण्यात आल्या. दरम्यान, मयत नागेश हा परभणी जिल्हयातील टाकळी कुंभकर्ण येथील रहिवासी असून मागील एक ते दिड वर्षापासून तो औंढा नागनाथ येथे मामाकडे राहात होता. या ठिकाणी तो कपडे विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबालाच हातभार लावत होता. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, जिल्हयात विसर्जन मिरवणुकीत डीजे लाऊ नये असे आवाहन पोलिस विभागच्या वतीने करण्यात आले होते. त्यासाठी पोलिस ठाण्यांमध्ये गणेश मंडळांच्या बैठकाही घेतल्या होत्या. मात्र त्यानंतरही औंढा नागनाथ पोलिस ठाण्यांतर्गत 10 तर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत 3 तर बासंबा पोलिस ठाण्यांतर्गत एक अशा 14 गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत डीजे लावले होते. त्यामुळे या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
Source link
विसर्जन मिरवणुकीत नाचतांना तरुणाचा भोवळ येऊन मृत्यू:मिरवणुकीवर दुःखाचे सावट, हिंगोली जिल्ह्यात डीजे लावणाऱ्या 14 मंडळांवर गुन्हे