![]()
‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात संगमनेर शहर व तालुक्यातील गणरायाला शनिवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. मानाच्या सोमेश्वर गणपतीसह विविध गणेश मंडळे आणि घरगुती गणपतींच्या विसर्जन मिरवणुका उत्साहात निघाल्या. पारंपरिक वाद्यांचा गजर, ढोल-ताशांचा निनाद आणि गणेशभक्तांच्या उत्साहामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून गणेश मंडळांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. यंदा अनेक मंडळांनी डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले. लाठीकाठी, लेझीम, शिवकालीन खेळांसह विविध प्रात्यक्षिकांनी मिरवणुकीची रंगत वाढवली. मानाच्या सोमेश्वर गणेश मंडळाने गेल्या २५ वर्षांपासून जपलेली डीजे व गुलालमुक्त मिरवणुकीची परंपरा यंदाही कायम ठेवली. प्रवरा नदीकाठ, गंगामाई घाट, म्हाळुंगी नदीकाठ तसेच जाणता राजा मैदानावरील कृत्रिम तलाव येथे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. खोल पाण्यात जाण्याचा धोका टाळण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने कन्व्हेअर बेल्टची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे गणेशमूर्ती सुरक्षितपणे विसर्जित करता आल्या. विसर्जनाच्या ठिकाणी एकविरा फाउंडेशनचे ४५० युवक-युवती स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. नागरिकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच निर्माल्य संकलन व परिसर स्वच्छतेचे काम त्यांनी केले. सुरक्षारक्षक व पोहणारे युवकही नदीकाठी तैनात होते. गणेशोत्सव काळात विविध मंडळांनी साकारलेले आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बाराव्या दिवसाच्या उत्साहानंतर गणरायाला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यांत पाणी आले. भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात गणेशोत्सवाची सांगता झाली. शहर व तालुक्यात शुक्रवारी नागरिकांनी गणरायाला निरोप दिला. पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष दिवसभर सुरू होता. लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येक जण या सोहळ्यात सहभागी झाला होता. दहा दिवस गणरायाचे पूजन, आरती केली. पण आज त्याच गणरायाला निरोप देण्याची वेळ आल्याने अनेकांचे डोळे पाणावले होते. परंतु, पुढल्या वर्षी लवकर या असे म्हणत गणरायाच्या आगमनाची आतुरताही दिसत होती. गणराया राज्यात भरपूर पाऊस पडू दे मानाच्या सोमेश्वर गणपतीची पूजा लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्याची परंपरा याही वर्षी मंडळाने कायम राखली माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार अमोल खताळ, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष मैथिली तांबे, नीलम खताळ यांच्या हस्ते गणपतीचे पूजन करण्यात आले. यावेळी राज्यात दुष्काळाची परिस्थिती असल्याने शेतकरी हतबल झाला आहे राज्यात भरपूर पाऊस पडू दे अशी प्रार्थना यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
Source link
गणेशोत्सव:ढोल-ताशांचा निनाद अन् प्रवरा काठावर उसळला भक्तांचा सागर