![]()
भारतीय निवडणूक आयोगाचा कारभार आणि मतदार याद्यांतील घोळावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सत्ताधारी भाजपला मदत व्हावी यासाठी मोदी आणि शहांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत असून, ही थेट ‘लोकशाहीची हत्या’ असल्याचा घणाघात राऊत यांनी केला आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात आता महाराष्ट्रात मोठी राजकीय एकजूट पाहायला मिळणार असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाविरोधात एकत्र येत येत्या ४ तारखेला संयुक्त महामोर्चा काढणार असल्याची घोषणा राऊत यांनी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप संजय राऊत यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर थेट निशाणा साधला. “मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे देशाचे दुश्मन नंबर एक आहेत. मोदी आणि शहांना जे हवे आहे, ते साध्य करण्यासाठी लोकशाही, स्वातंत्र्य आणि संविधानाची हत्या करून ते निर्णय देत आहेत. भाजपला लाभ होईल अशाच कृती ते करत असून, त्यांच्या या एकाधिकारशाही आणि पक्षपाती भूमिकेविरोधात इतर दोन निवडणूक आयुक्तांनीही उघड बंड पुकारले आहे,” असा दावा राऊत यांनी केला. १३ कोटी मतदारांची नावे वगळली मतदार याद्यांतील घोळाची आकडेवारी मांडताना राऊत म्हणाले की, देशातील तब्बल १३ कोटी मतदारांची नावे बेकायदेशीरपणे वगळण्यात आली आहेत. यामध्ये एकट्या महाराष्ट्रातील २ कोटी मतदारांचा समावेश आहे. महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली, बिहार आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्येही जाणीवपूर्वक नावे वगळून भाजपला राजकीय लाभ मिळवून देण्याचा घाट घातला जात आहे, अशी टीका त्यांनी केली. ४ तारखेला ठाकरे बंधूंची संयुक्त वज्रमूठ निवडणूक आयोगाच्या या कथित बेकायदेशीर कृतींविरोधात देशभरात संतापाचे वातावरण असून, दिल्लीतील जंतर-मंतरवर रोज आंदोलने सुरू झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती राऊत यांनी दिली. या चर्चेतून महाराष्ट्राचा संताप आणि रोष दिल्लीला दाखवून देण्यासाठी येत्या ४ तारखेला एक स्वतंत्र आणि भव्य मोर्चा काढण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले आहे. शिवसेना आणि मनसेसह राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी वेगवेगळी आंदोलने न करता, ४ तारखेला एकत्रितपणे सरकारच्या आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात आवाज उठवावा, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. हेही वाचा.. निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा:मुंबईत 4 ऑक्टोबरला मनसे-शिवसेनेचे संयुक्त आंदोलन; सर्वपक्षीय एकजुटीची हाक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वादग्रस्त ठरलेल्या ‘विशेष सघन पुनरीक्षण’ (SIR) प्रक्रियेवरून आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यशैलीवरून देशभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच, महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत ऐतिहासिक आणि राजकीय भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे. निवडणूक आयोगाने मतदारांची घोर फसवणूक केल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत निर्णायक संघर्षाचे रणशिंग फुंकले आहे. सविस्तर वाचा
Source link
मोदी-शहांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोगाचे काम:संजय राऊतांचा गंभीर आरोप, 4 ऑक्टोबरला महाराष्ट्राचा संताप दाखवणार; बंधूंचा संयुक्त मोर्चा