![]()
आपल्याला संधी मिळते, आपला विकास होतो आणि आपण विकसित होतो, तेव्हा आपल्या आधीच्या असंख्य पिढ्या त्यासाठी खपलेल्या असतात. आपण यशस्वी झाल्यानंतर थोडे मागे वळून पाहिले पाहिजे. अजूनही अज्ञानात खितपत पडलेल्या लोकांना बळ देणे, त्यांना पुढे घेऊन येणे ही आपली जबाबदारी आहे. स्वतःला फुलवण्यापेक्षा इतरांना फुलवण्यासाठी आपण जितके अधिक प्रयत्न करू, तितके आपले मानवी जीवन अधिक सफल झाले असे समजता येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ शनिवारी (२६ सप्टेंबर) पार पडला. या वेळी प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांना मानद डी. लिट. पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमास पेटंट्स, डिझाइन्स अँड ट्रेड मार्क्सचे महानियंत्रक प्रा. डॉ. उन्नत पंडित प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले. दीक्षांत समारंभामध्ये २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षातील एकूण १९९१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली, तर १४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. प्रा. डॉ. उन्नत पंडित यांनी शिक्षणाचा उपयोग समाजातील अडचणी दूर करण्यासाठी करण्याचे सांगत “अप्प दीपं भव’या ब्रीदवाक्याप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश बनण्याचे आवाहन केले. कुलपती अंकुशराव कदम यांनी अध्यक्षीय समारोप केला, तर कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ यांनी विद्यापीठाचा प्रगती अहवाल सादर केला. एमजीएमकडून विचारधारेचा सन्मान प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांना मिळालेली मानद डी. लिट. ही केवळ एका व्यक्तीची नव्हे, तर फुले-शाहू-आंबेडकरी आणि बुद्ध-चार्वाक या पुरोगामी वैचारिक परंपरेची मोठी स्वीकृती आहे. उच्च शिक्षण व पदवी मिळवल्यानंतर केवळ स्वतःचा विकास न साधता, अज्ञानात राहिलेल्या समाजातील वंचितांना सोबत घेऊन जाणे हीच खरी गुणवत्तेची व शिक्षणाची सार्थकता आहे, हा संदेश यातून मिळतो. यशाचे श्रेय आईला : डॉ. माशेलकर पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर म्हणाले, मी लहानपणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतले. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत अनवाणी चालत शाळेत गेलो. आजच्या यशाचे संपूर्ण श्रेय मी माझ्या आपल्या आईला देत देतो आणि ही पदवीही तिला समर्पित करतो. एमजीएमकडून मिळणारी मानद डी.एस्सी. पदवी आपण अत्यंत आनंदाने स्वीकारत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
Source link
एमजीएम विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ उत्साहात:अज्ञानात खितपत पडलेल्यांना पुढे आणा: डॉ. आ. ह. साळुंखे यांचे आवाहन; पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकरांना डी.एस्सी. पदवी