![]()
दौलताबाद ते खुलताबाद राष्ट्रीय महामार्गावरील दौलताबाद घाटात बस आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (२७ सप्टेंबर) दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घाटातील मलिक हॉटेलसमोरील तीव्र वळणावर घडली. दुचाकीवरील दोघांनीही हेल्मेट घातलेले नसल्याने धडकेनंतर डांबरी रस्त्यावर आदळून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अक्षय साहेबराव दवंगे (३०) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर अक्षय कारभारी बोडखे (३३, दोघेही रा. मनूर, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर घाटी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दोघेही मित्र अविवाहित होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अक्षय दौंगे हा वाळूज-गंगापूर एमआयडीसी परिसरातील एका खाजगी कंपनीत कामाला होता. तो काही दिवसांपासून सुटीवर गावी होता. पुन्हा कामावर रुजू व्हायचे असल्याने, रविवारी सकाळी तो मित्र अक्षय बोडखे याच्यासह वाळूज एमआयडीसीत भाड्याने खोली पाहण्यासाठी आला होता. खोली पाहून दुपारी दोघेही त्यांच्या स्पोर्ट्स दुचाकीवरून (एमएच ५७ ए ८८२०) मनूरकडे परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. दरम्यान, वाळूज एमआयडीसीत खोलीत पाहून येतानाच हा अपघात घडला. वळणावरील ब्लाइंड स्पॉटमुळे बस-दुचाकीचा चुकला अंदाज प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, धुळे येथून ५५ प्रवाशांना घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे येणारी बस दुपारी सव्वातीनच्या सुमारास दौलताबाद घाट उतरत होती. त्याचवेळी हे दोघे मित्र दुचाकीने घाट चढत होते. मलिक हॉटेलसमोर तीव्र उतार आणि वळण असल्याने समोरून येणारे वाहन दृष्टीस पडत नाही. या वळणावर बसचा घेर आणि दुचाकीचा समोरासमोर अंदाज न आल्याने दोन्ही वाहनांची धडक झाली. या पट्ट्यात वळणापूर्वी वाहनांचा वेग नियंत्रित करणारे पुरेसे रंबल स्ट्रिप्स नाहीत.
Source link
बस-दुचाकीच्या धडकेमध्ये तरुणाचा मृत्यू:वाळूज एमआयडीसीत खोली पाहून गावाकडे परतताना अपघात