Headlines

मराठवाड्यातील पाणीप्रश्‍नावर पाणी पुरवठा मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक:टंचाई उपाय योजनांवर दिल्या जाणार आवश्‍यक सूचना, 246 टँकरने सुरु आहे पाणी पुरवठा




मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीनंतर आता पाणी प्रश्‍न गंभीर होणार असून या पार्श्वभुमीवर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने मराठवाड्याची टंचाईच्या अनुषंगाने बुधवारी ता. 30 आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीत पाणी पुरवठा विभागासह भुजल सर्वेक्षण, जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मराठवाड्यात यावर्षी दुष्काळी परिस्थती निर्माण झाली असून शासनानेही 76 पैकी 74 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहिर केला आहे. या शिवाय मराठवाड्यातील आठही जिल्हयांमध्ये सध्याच्या स्थितीत केवळ 67 टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे भविष्यात पाणी प्रश्‍न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सध्याच्या स्थितीतच पावसाळ्यात 142 गावे व 91 वाड्यांना तब्बल 246 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. या शिवाय 350 गावांमधून 512 खाजगी विहीर व विंधन विहीरी अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, आता परतीच्या पावसाची शक्यता मावळली असून पाऊस न झाल्यास भूगर्भातील पाणीसाठा वाढणारच नाही. त्यामुळे यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणीस्त्रोत आटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासूनच टंचाई उपाय योजना हाती घ्यावा लागणार आहेत. तर उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त गावांमधून गावकऱ्यांचे मोठे हाल होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभुमीवर मराठवाड्यातील आठही जिल्हयांतील पाणी टंचाई आढावा बैठक बोलावण्यात आली आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बुधवारी ता. 30 मुंबई येथे हि बैठक होणार आहे. या बैठकीस जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, जल जीवन मिशनचे अभियान संचालक, विभागीय आयुक्त भुजल सर्वेक्षण विभागाचे आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यासह जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांना बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *