Headlines

शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना डॉ. प्रभा अत्रे पुरस्कार:गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाऊंडेशनतर्फे सन्मान; 'गायकाने प्रतिभा घेऊनच जन्माला यावे' असे मत.




गायकाने प्रतिभा घेऊनच जन्माला यावे लागते. त्याच्याकडे तळमळ तसेच प्रतिभेला साजेसा स्वभाव असणे आवश्यक असते. असे घडल्यास गायकाला गाणे आत्मसात होऊ लागते. आम्हा गायकांना आनंद आणि प्रेरणा देणाऱ्या डॉ. प्रभा अत्रे यांच्या नावे मिळालेला पुरस्कार अतिशय आनंददायी आहे. त्यांचे गाणे ऐकल्यानंतर तानपुरा काढून रियाजाला बसत स्वरांचा मागोवा घेण्याची इच्छा निर्माण होत असे, अशा भावना सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांनी व्यक्त केल्या. गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराने आरती अंकलीकर-टिकेकर यांचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या यांच्या हस्ते झाले. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पणशीकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर, गानवर्धनचे अध्यक्ष डॉ. दयानंद घोटकर, तात्यासाहेब नातू फाऊंडेशनचे अध्यक्ष शारंग नातू, डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. मंचावर होते. ५० हजार रुपये, शाल, सन्मानचिन्ह आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते. टिळक स्मारक मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शास्त्रीय संगीताचा प्रवास हा खडतर आणि खाचखळग्यांचा असतो, त्यात कधीतरी धडपडून, खरचटून घरी आल्यावर मलमपट्टी करणारे कुटुंबिय मोलाचे असतात, असे सांगून आरती अंकलीकर-टिकेकर म्हणाल्या, माझ्या संगीत क्षेत्रातील गुरूंसह मला भेटलेल्या सगळ्या दिग्गज कलाकारांनी मला कोणत्या ना कोणत्या रूपात काही ना काही तरी शिकविले आहे आणि आजही शिकवत आहेत. माझ्या यशात कुटुंबियांसह शिष्य आणि रसिकांचादेखील मोलाचा वाटा आहे. श्रोत्यांची दाद आणि प्रतिसादाशिवाय कुठलाही कलाकार घडू शकत नाही. गायन ही सादरीकरणाची कला असल्यामुळे गायक आणि श्रोत्यांचा संवाद याला अतिशय महत्त्व आहे. डॉ. सदानंद मोरे म्हणाले, डॉ. प्रभा अत्रे यांच्या नावे दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार माझ्या हस्ते देण्याचे भाग्य लाभले म्हणून मी दैवाचा ऋणी आहे. प्रकाशक या नात्याने मी संगीता क्षेत्राशी जोडलेला असून लहानपणी उस्ताद सईउद्दिन डागर यांच्याकडे ध्रुपद गायकीची काही वर्षे तालीम घेतली आहे. गानधर्वन संस्था तसेच स्वरमयी गुरुकुलतर्फे संगीत क्षेत्रातील गोवर्धन पर्वत उचलण्याचे कार्य घडत आहे. गेली काही दशके जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेगाने विकास होत आहे. याचा उपयोग सांगितीक क्षेत्रातील कलाकारांनाही होत आहे. परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता हे वरदान आहे की शाप याचा साकल्याने विचार होणे आवश्यक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *