निवडणूक आयोगाच्या मतदार यादी विशेष सघन पुनरीक्षण (SIR) मोहिमेवरून आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यशैलीवरून देशभरात विरोधक आक्रमक झालेले असताना, शिवसेना (शिंदे गट) चे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत खळबळजनक वक्तव्य केले
.
मतचोरीवर उघडपणे बोलणारा मी सत्ताधाऱ्यांमधील एकमेव नेता!
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांचा समाचार घेताना संजय गायकवाड म्हणाले, “नगरपरिषद आणि विधानसभेच्या निवडणुका आल्या की विरोधक नेहमी भाजप व मित्रपक्ष बोगस मतांच्या जोरावर निवडून येत असल्याचा कांगावा करतात. मात्र, एसआयआर मोहीम सुरू होण्यापूर्वी सत्ताधारी पक्षाचा असूनही मी उघडपणे सांगणारा पहिला नेता होतो की माझ्या मतदारसंघात 50 हजार बोगस मतदार आहेत. अनेक मतदारांची नावे दोन-दोन ठिकाणी नोंदवलेली होती.”
71 हजार मतदार कमी झाले
“माझ्या मतदारसंघात 3 लाख 23 हजार मतदारांपैकी प्राथमिक तपासणीतच 23 हजार मतदार बोगस आढळले होते. आता निवडणूक आयोगाचे बीएलओ (BLO) घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करत असल्याने माझ्या मतदारसंघातील तब्बल 71 हजार बोगस मते वगळली गेली आहेत. ही सर्व बोगस नावे काँग्रेसच्या काळातील होती. ज्ञानेश कुमार यांनी बोगसगिरीला चाप लावला असून, विरोधकांनी यात नाहक राजकारण करू नये आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करू नये.”

रोहित पवारांनी आमदारकीचा राजीनामा देऊन IPS बनावे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेवर खोचक टोला लगावताना गायकवाड म्हणाले, “रोहित पवारांना प्रत्येक गोष्टीत संशय घेण्याची सवय झाली आहे. त्यांनी सरळ आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि आयएएस (IAS) किंवा आयपीएसची (IPS) परीक्षा देऊन अधिकारी बनावे. मग त्यांनी स्वतःच पोलीस बनून प्रत्येक प्रकरणाची चौकशी करावी, तरच कदाचित त्यांचे समाधान होईल.”
दोन्ही शिवसेना आता एकत्र येऊ शकत नाहीत
राजकीय समीकरणांवर बोलताना ते म्हणाले, “कार्यकर्त्यांना वाटते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात किंवा दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात. कार्यकर्त्यांची ती भावना स्वाभाविक असली, तरी आता दोन्ही शिवसेना एकत्र येणे राजकीयदृष्ट्या शक्य नाही.”
शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी तरी दुष्काळात लगेच रोख पैसे वाटले होते का?
विरोधकांच्या दुष्काळी आंदोलनांवर आणि पंढरपुरातील मोर्चांवर निशाणा साधताना गायकवाड यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांवर थेट टीका केली. “शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करू नये आणि आपल्याला आंदोलने करून राजकीय पोळी भाजता यावी, असा विरोधकांचा कट होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री स्वतः शेताच्या बांधावर गेले आणि त्यांनी तत्काळ 265 तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर करून विरोधकांची सर्व स्वप्ने धुळीस मिळवली.”
“शेतकऱ्यांना लगेच रोख पैसे द्या, अशी मागणी आज विरोधक करत आहेत. शरद पवार साहेब तर महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होते; त्यांनी तरी दुष्काळ जाहीर झाल्याबरोबर शेतकऱ्यांना लगेच रोख पैसे वाटले होते का? संकटकाळात शेतकऱ्यांच्या दुःखावर विरोधकांनी घाणेरडे राजकारण करणे थांबवावे.”
दुष्काळाचा चटका फक्त शेतकऱ्याला; पण कुंभमेळा ही धार्मिक परंपरा
नाशिकमधील आगामी कुंभमेळा आणि दुष्काळी परिस्थितीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “ज्या भागात कुंभमेळा होतो, तिथे दुष्काळाची तीव्रता तशी कमी आहे. कुंभमेळा ही निरंतर चालणारी सनातन धार्मिक परंपरा आहे. दुष्काळ असो वा अतिवृष्टी, धार्मिक विधी कधी थांबत नाहीत. तिथे कोणताही पैशांचा अपव्यय किंवा हुल्लडबाजी नसते. त्यामुळे दुष्काळाचे कारण पुढे करून कुंभमेळा थांबवण्याची गरज नाही.”
“दुष्काळाची खरी दाहकता आणि विदारकता केवळ शेतकऱ्यालाच भोगावी लागते. त्याचा कोणताही फरक नोकरदार, अधिकारी, व्यापारी किंवा उद्योजकांना पडत नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांची जीवनशैली तशीच सुरू राहते. शेतकरी उपाशी असताना इतरांनी किती भपकेबाज कार्यक्रम करायचे, हा ज्याचा त्याचा मानवतेचा प्रश्न आहे.”
विकासकामे बंद करणे पर्याय नाही
“शासकीय कामे थांबवली तर प्रकल्पांचा खर्च दुपटीने वाढतो. सध्याची विकासकामे कर्जाच्या आधारावर सुरू आहेत. दुष्काळामुळे तिजोरीवर ताण नक्कीच आला आहे; परंतु सुरू असलेली विकासकामे थांबवणे हा त्यावरचा उपाय असू शकत नाही,” असेही आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले.
—————————-
हेही वाचा…
आंदोलनाची धग दिल्लीपर्यंत पोहोचणार:राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद, ठाकरे बंधूंचा मोर्चा हुकूमशाहीविरुद्ध!; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर चौफेर हल्ला

“केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात आक्रोशाचा भडका उडणार आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येत 4 ऑक्टोबरला पुकारलेल्या जनमोर्चाची धग दिल्लीपर्यंत पोहोचेल आणि सरकारला ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावाच लागेल. राज ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामध्येही थेट संवाद सुरू असून, विरोधी पक्षांची ही एकजूट देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी आहे,” असा मोठा खुलासा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी