![]()
केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात सिया गोयल हिच्या शाळकरी वयातील ‘त्या’ एक्स-बॉयफ्रेंडने पोलिसांना अत्यंत महत्त्वाची माहिती दिली असून, या रंजक धागेदोऱ्यांचा उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांनी नुकत्याच न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. पुण्यासह देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात पोलिसांनी तब्बल साडेपाच हजार पानांचे विस्तृत आरोपपत्र दाखल केले आहे. इतकेच नव्हे तर लोहगडावरून केतनला ढकलून देताना सिया आणि चेतनला काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले, त्यांना देखील खाली ढकलून देण्याची धमकी चेतन चौधरीने दिल्याची माहिती समोर आली आहे. शाळेतल्या प्रियकराच्या संदर्भातील मिळालेल्या माहितीनुसार, सिया गोयल दहावीत असताना शाळेत तिचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. आता त्या एक्स बॉयफ्रेंडने केतन हत्या प्रकरणात जबाब दिला आहे. त्याने सांगितले की, सिया दुसऱ्या मुलाच्या म्हणजेच चेतनच्या प्रेमात पडल्याचे समजल्यानंतर त्याने सियाशी संबंध तोडले होते. आता केतन हत्या प्रकरणी सियाचे नाव चेतनसोबत जोडल्या गेल्याने या जुन्या प्रियकराने असा जबाब दिल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. आता या जबाबामुळे प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सियाला तब्बल 7 ते 8 लाख रुपयांचे 28 ड्रेस भेट दिले- विशाल अग्रवाल केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या आरोपपत्रात त्याचे वडील विशाल अग्रवाल यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीचा सविस्तर उल्लेख आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. 11 फेब्रुवारी 2026 रोजी पुण्यातील वेस्ट इन हॉटेलमध्ये गोयल आणि अग्रवाल कुटुंबीयांची पहिली भेट झाली आणि सिया व केतन यांचा ‘रोका’ विधी पार पडला. यावेळी केतन अतिशय आनंदात होता. या पहिल्याच भेटीत आणि रोका विधीच्या निमित्ताने अग्रवाल कुटुंबाने सियाला तब्बल 7 ते 8 लाख रुपये किमतीचे 28 ड्रेस भेट म्हणून दिले होते. ’80 लाख रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने दिले’ त्यानंतर 19 फेब्रुवारी 2026 रोजी पुण्यातील रिट्झ कार्लटन हॉटेलमध्ये केतन आणि सिया यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. याप्रसंगी अग्रवाल कुटुंबाकडून सियाला तब्बल 80 लाख रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने देण्यात आले होते. एवढेच नाही तर, सिया आणि केतनच्या या शाही विवाहसोहळ्यासाठी अग्रवाल कुटुंबाने खरेदीवर तब्बल चार ते पाच कोटी रुपये खर्च करण्याची तयारी ठेवली होती, असा दावाही विशाल अग्रवाल यांनी पोलिसांकडे केला आहे. उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंगचे नियोजन केतन हा विशाल अग्रवाल यांचा एकुलता एक मुलगा असल्याने संपूर्ण कुटुंबात त्याच्या लग्नासाठी प्रचंड उत्साह होता. मुलाच्या लग्नात पैशांची कोणतीही कमतरता भासू नये आणि वाट्टेल तितका खर्च करण्याची त्यांची तयारी होती. याच शाही नियोजनाचा भाग म्हणून त्यांच्या लग्नासाठी राजस्थानमधील उदयपूर येथे एक अत्यंत आलिशान रिसॉर्ट निश्चित करण्यात आले होते. या रिसॉर्टच्या बुकिंगसाठी मालकाला तब्बल 25 लाख रुपयांची आगाऊ रक्कम (अॅडव्हान्स) दिल्याचेही या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींना लोहगडावरून फेकून देण्याची धमकी विशाल अग्रवाल यांनी लोहगडावर प्रत्यक्षदर्शींना सिया आणि चेतन चौधरी यांनी मध्ये पडल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही सांगितले आहे. ते म्हणाले की, हे मी सुद्धा चार्जशीटमध्ये वाचले आहे की त्यांनी प्रत्यक्षदर्शींना सरळ जीवे मारण्याची आणि लोहगडावरून फेकून देण्याची धमकी दिली. म्हणजे याचा अर्थ काय, तर हे सगळे लोक क्रिमिनल माइंडेड आहेत. ते एकटे एवढा मोठा विचार करूच शकत नाहीत. याच्या पाठीमागे सियाचे आई, वडील, भाऊ, आत्या आणि तिचे काका हे सपोर्टला असतील. ज्यांच्या जीवावर हे लोक एवढे धाडस करू शकतात. एवढा मोठा गुन्हा करूनही हे लोक अजून बाकीच्या प्रत्यक्षदर्शींना धमकावत आहेत. पुढे बोलताना विशाल अग्रवाल म्हणाले, सध्या तर सिया, चेतनचेच नाव समोर येत आहे, सियाचे जे कुटुंब सध्या बाहेर आहे, ज्याच्यात तिचे आई-वडील, मामा, आत्या आणि भाऊ साहिल आहेत, हे लोक प्रत्यक्षदर्शींना भेटून त्यांना धमकावण्याचा आणि त्यांनी कोर्टात साक्ष देऊ नये यासाठी प्रयत्न करतील. आपल्या मुलांना वाचवण्यासाठी ते हे सर्व प्रयत्न करतीलच. तर घटना पाहिलेल्या एका महिला साक्षीदाराला सुद्धा त्यांनी असेच धमकावले होते की, ‘ती जर कोणासमोर काही बोलली, तर तिला मारून टाकण्यात येईल… आम्ही मारून टाकू.’ त्यांनी स्पष्टपणे ‘आम्ही मारून टाकू’ असा शब्दप्रयोग केला आहे. म्हणजे आज साक्षीदार फोडण्यासाठी हे लोक प्रचंड प्रयत्न करत असल्याचा दावा अग्रवाल यांनी केला आहे. ‘माझ्या मुलाच्या ठिकाणी जर कुठली मुलगी असती..’ सध्या सियाच्या परिवारातील कोणाचेही नाव या चार्जशीटमध्ये दिसत नाहीये. परंतु माझा तोच प्रश्न कायम राहतो की, माझ्या मुलाच्या ठिकाणी जर कुठली मुलगी असती आणि तिची हत्या झाली असती, तर आई, वडील, भाऊ आणि कुटुंबातल्या बाकीच्या सर्व लोकांना आरोपी करून आतापर्यंत जेलमध्ये टाकले असते. फक्त हा मुलगा आहे म्हणून त्यांच्यावर कसलेही आरोप लावलेले नाहीत. आता स्पष्ट दिसून येत आहे की ते या कटात सामील होते. त्यांच्या मुलीच्या चॅटिंगवरूनही ते या कटात असल्याचे स्पष्ट होत आहे. तरीही त्यांना आरोपी केलेले नाही. म्हणजे मुलगा आणि मुलगी यांच्यात एवढा मोठा फरक केला जातोय का? एखाद्या मुलीचा खून झाला असता तर सर्व सामाजिक संस्था आणि नागरिक रस्त्यावर उतरले असते, आंदोलन झाली असती. पण फक्त हा मुलगा आहे म्हणून कोणीही समोर आलेले नाही, कुठलीही सामाजिक संस्था पुढे आलेली नाही, असा आरोप विशाल अग्रवाल यांनी केला आहे. मुलगा असणे ही काही चूक आहे का? विशाल अग्रवाल म्हणाले, मुलगा असणे ही काही चूक आहे का? आज एका चांगल्या मुलाची हत्या होते, तेव्हा कोणीही पुढे येत नाही. माझे जे नुकसान झाले आहे ते तर कोणीच भरून देऊ शकत नाही, माझे दुःख मलाच माहिती आहे. पण या गोष्टीचे कुठेतरी समाजालाही नुकसान आहेच ना? आज आपण आपल्या मुलांना लहानपणापासून शिकवतो की मुलींची आणि महिलांची इज्जत कशी करायची, त्यांना मान-सन्मान कसा द्यायचा. आणि दुसरीकडे एखादी बिघडलेली मुलगी एका चांगल्या मुलाचा खून करते, आणि असा गुन्हा करूनही तिला शिक्षा होण्यासाठी एवढा विलंब होतोय, असे दुःख त्यांनी बोलून दाखवले. ‘माझ्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मला मदत करा’ पुढे विशाल अग्रवाल म्हणाले, मला आज फास्ट ट्रॅक कोर्टासाठी वारंवार फिरावे लागत आहे. जर एखाद्या मुलीची हत्या झाली असती, तर प्रकरण ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टात गेले असते, केस लगेच सुरू झाली असती आणि सगळे काही जलद गतीने झाले असते. परंतु आज हा फक्त एक मुलगा आहे म्हणून त्याच्यासाठी कुठली संस्था किंवा सामाजिक लोक पुढे येत नाहीत. माझी सर्व सामाजिक संस्था आणि नागरिकांना हात जोडून विनंती आहे की, कृपया सर्वांनी समोर यावे आणि माझ्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मला मदत करावी. ‘माझ्या मुलाला मारायची काय गरज होती?’ माझा एकच मोठा प्रश्न आहे की, जर त्या मुलीला माझ्या मुलासोबत लग्न करायचे नव्हते आणि चेतन चौधरीसोबतच लग्न करायचे होते, तर माझ्या मुलाला मारायची काय गरज होती? यावरून असे स्पष्ट होते की नरेंद्र मित्तल, रेणू मित्तल, प्रवीण गोयल, पूजा गोयल आणि साहिल गोयल यांचे काहीतरी वेगळे कट होते आणि ते साध्य करण्यासाठीच त्यांनी माझ्या मुलाची हत्या केली. परंतु तरीही त्या लोकांना अद्याप आरोपी करण्यात आलेले नाही, असेही विशाल अग्रवाल म्हणाले. ‘आरोपींना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी’ पोलिसांनी या प्रकरणाचा खूप चांगला तपास करून ही केस उघडकीस आणली आहे आणि भरपूर पुरावे जोडले आहेत. परंतु जे लोक अजूनही बाहेर आहेत आणि ज्यांनी माझ्या मुलाच्या हत्येचा कट रचला आहे, त्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत माझा हा लढा चालूच राहील, असा निर्धार विशाल अग्रवाल यांनी केला आहे. हे लोक बाहेर राहून प्रत्यक्षदर्शींना जीवे मारण्याची धमकी देत आहेत, त्यांच्यावर दबाव आणत आहेत आणि त्यांनी साक्ष देऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत. त्यामुळे माझी न्यायव्यवस्था, सरकार आणि मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आहे की, ही केस लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून, सर्व साक्षीदारांची साक्ष नोंदवून आरोपींना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी संतप्त मागणी अग्रवाल यांनी केली आहे.
Source link
सियाच्या 'शाळेतल्या प्रियकराने' पोलिसांना सगळंच सांगितलं:तर चेतनने प्रत्यक्षदर्शींनाही ढकलून देण्याची दिली होती धमकी; चार्जशीटमध्ये नेमकं काय?