![]()
हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नावर मागील एक महिन्यापासून सुरू असलेले असहकार आंदोलन अखेर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांच्या मध्यस्थीने मंगळवारी (ता. २९) मागे घेण्यात आले. त्यामुळे आता ग्रामपंचायतच्या कामकाजामध्ये तसेच प्रशासकीय माहिती उपलब्ध करून देण्याच्या कामात गती येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात ग्राम पंचायत अधिकाऱ्यांचे चुकीच्या पध्दतीने केलेले निलंबन रद्द करावे, वेतनवाढ रोखण्याची कारवाई रद्द करावी, निवानी व पुरावे नसलेल्या तक्रारदारांच्या तक्रारीची दखल घेऊ नये, अतिरिक्त ग्रामपंचायतचा पदभार असलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अतिरिक्त मानधन द्यावे, विभागीय चौकशीमध्ये आलेल्या निर्णयावर सौम्य शिक्षा द्यावी, पात्र कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल देण्यात यावे, सन २०२२-२३ ते सन २०२५-२६ पर्यंतचे रखडलेले आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरीत करावे, कालबध्द पदोन्नतीचा लाभ द्यावा यासह इतर मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्यांबाबत प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार संघटनेने तारीख 20 ऑगस्ट पासून असहकार आंदोलन सुरू केली होते. या आंदोलनामध्ये ग्रामपंचायत पातळीवरील कुठलीही माहिती वरिष्ठ कार्यालयाला न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे गाव पातळीवरील माहिती मिळणे कठीण झाली होते. दरम्यान जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने यांनी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची सोमवारी ता २८ बैठक घेतली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे पाटील, सचिव राजेश किलचे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित आहेत त्या मागण्या तातडीने सोडविण्याचे करण्याचे आश्वासन देण्यात आले. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघाला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे पाटील, सचिव राजेश किलचे यांनी असहकार आंदोलन मागे घेत असल्याचे लेखी पत्र जिल्हा परिषदेकडे सादर केले आहे. तब्बल एक महिन्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याने आता कामकाजाला गती येणार असल्याचे बोलले जात आहे.
Source link
अखेर एक महिन्यानंतर ग्राम पंचायत अधिकाऱ्यांचे असहकार आंदोलन मागे:अतिरिक्त सीईओंची मध्यस्थी; प्रशासकीय कामाला गती येणार