![]()
शहरातील ट्युशन एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत निर्माण झाली आहे. दुचाकीचा रिक्षेला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून, नशेत धुंद असलेल्या टोळक्याने दोन विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेमुळे शिक्षणानिमित्त येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी रात्री ठाकरे चौकातून दोन विद्यार्थी त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीचा एका रिक्षेला किरकोळ धक्का लागला. याच कारणावरून रिक्षातील आणि परिसरातील काही तरुणांनी या विद्यार्थ्यांना अडवून त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. हा वाद वाढल्यानंतर टोळक्याने अचानक विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला चढवला. हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून घटनेच्या वेळी ते नशेत होते. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. विद्यार्थ्यांवर थेट शस्त्रांनी हल्ले होऊ लागल्याने या परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
लातूर हे राज्याचे महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र असून, येथे जिल्ह्यासह राज्यभरातून विद्यार्थी येतात. ट्युशन एरियात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. अशा गजबजलेल्या व संवेदनशील भागात मद्यपी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण हातात कोयते घेऊन दहशत माजवत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवून गुंडांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.
Source link
ट्युशन एरियात कोयता गँगची दहशत; विद्यार्थ्यांवर हल्ला:रिक्षाला कट लागल्याच्या कारणावरून नशेत धुंद टोळक्याचा धिंगाणा; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण