![]()
पुणे महानगरपालिकेत (PMC) कायमस्वरूपी शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या महाघोटाळ्यात जेजुरीच्या प्रसिद्ध श्री मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. राजेंद्र बबनराव खेडेकर यांना शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी महापालिकेचे बनावट लेटरहेड, खोटे शिक्के, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि चक्क काही महिने बँक खात्यात पगार जमा करण्याचा बनाव करून 14 हून अधिक तरुणांना तब्बल पावणेतीन कोटी रुपयांना गंडा घातल्याचे तपासात उघड झाले आहे. न्यायालयाने आरोपी राजेंद्र खेडेकर याला 3 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मे 2022 ते मे 2025 दरम्यान फसवणुकीचे जाळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधीक्षकांनी दिलेल्या अधिकृत फिर्यादीनुसार, हा संपूर्ण गैरव्यवहार मे 2022 ते मे 2025 या तीन वर्षांच्या कालावधीत पद्धतशीरपणे चालवला गेला. या प्रकरणात डॉ. राजेंद्र खेडेकर यांच्यासह पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील आणि नमिता बनसोडे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर तसेच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. तपासादरम्यान मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी खेडेकर यांना अटक केली. हुबेहूब बोगस यंत्रणा: सेवा पुस्तिका ते बँक खात्यात पगार उमेदवारांना संशय येऊ नये म्हणून या टोळीने अत्यंत धूर्तपणे शासकीय कामकाजाची हुबेहूब नक्कल तयार केली होती. पुणे महापालिकेच्या विविध पदांवर थेट नियुक्ती झाल्याचे भासवून आरोपींनी पालिकेचे बनावट लेटरहेड आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या असलेले रुजू अहवाल (Joining Letters) उमेदवारांच्या हातात दिले. सेवा पुस्तिका व वैद्यकीय प्रमाणपत्रे शासकीय नोकरीत लागणारी सेवा पुस्तिका, वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे आणि महापालिकेचे ओळखपत्रदेखील बोगस पद्धतीने छापून तरुणांना देण्यात आले. तरुणांचा पूर्ण विश्वास बसावा यासाठी आरोपींनी काही महिने संबंधितांच्या बँक खात्यात रीतसर पगार जमा केल्याचे दाखवले आणि त्यांच्या हातात पगाराच्या बनावट पावत्यादेखील दिल्या. 14 हून अधिक तरुणांकडून पावणेतीन कोटी उकळले शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुणांचा गैरफायदा घेत आरोपींनी प्रत्येकाकडून लाखो रुपयांची मागणी केली. आतापर्यंत निष्पन्न झालेल्या तपासानुसार, 14 हून अधिक सुशिक्षित बेरोजगारांकडून एकूण 2 कोटी 75 लाख रुपयांहून अधिक (पावणेतीन कोटी) रक्कम लाटण्यात आली आहे. प्रत्यक्षात महापालिकेत रुजू होण्यासाठी जेव्हा तरुण पोहोचले आणि प्रशासकीय पातळीवर कागदपत्रांची पडताळणी झाली, तेव्हा हे सर्व नियुक्ती आदेश आणि कागदपत्रे पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले. देवस्थानच्या वर्तुळात प्रचंड खळबळ महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तालाच थेट कोट्यवधींच्या नोकरी फसवणूक प्रकरणात अटक झाल्यामुळे धार्मिक तसेच राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या रॅकेटमध्ये महापालिकेतील आणखी काही वरिष्ठ अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचे हात गुंतले आहेत का, लाटलेली कोट्यवधींची रक्कम कुठे गुंतवण्यात आली, तसेच आणखी किती तरुणांची अशाच प्रकारे फसवणूक झाली आहे, याचा सखोल तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. ———————– हेही वाचा… खासदार संजय राऊतांविरोधात हायकोर्टात अवमान याचिका दाखल: न्यायाधीशांना ‘दलाल’ म्हणणे अन् न्यायव्यवस्थेला ‘वाळवी’ची उपमा; खंडपीठाकडून नोटीस जारी न्यायव्यवस्था आणि थेट न्यायालयातील न्यायमूर्तींवर अत्यंत आक्षेपार्ह, अवमानकारक विधाने केल्याच्या गंभीर आरोपावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात संजय राऊत यांच्याविरोधात ‘फौजदारी न्यायालयाचा अवमान’ याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची प्राथमिक दखल घेत न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे आणि न्यायमूर्ती वैशाली पाटील-जाधव यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने खासदार संजय राऊत यांच्यासह संबंधित वक्तव्ये प्रसारित करणाऱ्या माध्यम घटकांना अधिकृत नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
जेजुरी देवस्थानच्या विश्वस्ताचा महापालिका भरती घोटाळा उघड:बनावट सह्या, बोगस जॉइनिंग अन् बँक खात्यात पगार टाकून पावणेतीन कोटी लाटले; राजेंद्र खेडेकरला अटक