Headlines

पुणे आयुक्तांना धमकी दिल्याने युवक काँग्रेसचे कुंभकर्ण आंदोलन:90 कोटींच्या निविदेवरून वाद, महापालिका गेटवर सरकारविरोधात घोषणाबाजी




महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना ९० कोटी रुपयांच्या रस्ता निविदेवरून एका सत्ताधारी आमदाराने ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप झाल्यानंतर पुणे शहर युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणात राज्य शासन आणि प्रशासनाने कारवाई करावी, या मागणीसाठी युवक काँग्रेसने बुधवारी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘कुंभकर्ण’ आंदोलन केले. ९० कोटी रुपयांच्या रस्ता निविदेत पसंतीच्या ठेकेदाराला काम न मिळाल्याने संबंधित आमदाराने आयुक्तांना धमकी दिल्याची माहिती यापूर्वी समोर आली आहे. आयुक्तांनीही धमकीचा दूरध्वनी आल्याच्या माहितीला दुजोरा दिला होता; मात्र संबंधित आमदाराचे नाव जाहीर केलेले नाही. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका गेटसमोर ‘कुंभकर्ण’ रुपी प्रतीकात्मक पुतळा झोपवून त्याभोवती ढोल-ताशे वाजवत घोषणाबाजी केली. ‘प्रामाणिक अधिकाऱ्यांवर दबाव आणणाऱ्या आमदारांवर कारवाई झाली पाहिजे’, ‘ठेकेदारधार्जिणे सरकार हाय हाय’, अशा घोषणा देण्यात आल्या. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, “आयएएस अधिकाऱ्यांना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून धमक्या दिल्या जात असतील, तर सामान्य नागरिकांचे काय?” सरकार आणि गृह विभागाला जागे करण्यासाठी हे आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ अमराळे यांनी आयुक्तांच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी असल्याचे सांगत, धमकी देणाऱ्या आमदाराचे नाव जाहीर करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास शहरात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनात महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे, नगरसेवक सुनील शिंदे, मेघश्याम धर्मावत, ऋषिकेश थोरात यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *