![]()
महिलांना मोफत शिवणकाम व ब्युटीपार्लर प्रशिक्षण देण्यासह शासकीय योजनेंतर्गत शिलाई मशीन आणि १५ हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून हजारो महिलांची सव्वादोन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी चार महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपी पती-पत्नीला लासलगाव पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथून अटक केली. संजय बोराळे व जयश्री बोराळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातील हजारो महिलांची ७५ करोडची फसवणूक केल्याचा आरोप या संशयितांवर आहे. लासलगाव पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर २९ सप्टेंबर रोजी हे दोघे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने तेथे जाऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन पाटील, पोलिस कॉन्स्टेबलसह पोलिस पथकाने ही कारवाई केली. दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध गावांमध्ये महिलांचे बचत गट स्थापन केले जात होते. ब्युटीपार्लर व शिवणकामाचे मोफत प्रशिक्षण दिले जात असल्याचा उपक्रम राबविला जात होता. शासनाच्या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीन व १५ हजार रुपये मिळवून देण्याचे आश्वासन दिले जात होते. काही महिलांना सुरुवातीला पिठाच्या गिरण्या व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे संस्थेच्या योजनेवर महिलांचा विश्वास बसला. या प्रकरणाची व्याप्ती केवळ लासलगावपुरती मर्यादित नसून निफाड, सिन्नर, येवला, नांदगाव व चांदवडमधील अनेक गावांमधील महिलांना या योजनेचे आमिष दाखविण्यात आल्याची माहिती आहे. आरोपींवर ३ ते ४ हजार महिलांची सव्वादोन कोटी पेक्षा जास्त फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी लासलगाव, सिन्नर, घोटी व वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहे.
Source link
महिलांची सव्वादोन कोटींची फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला अखेर अटक:विंचूरच्या दिव्यज्योत संस्थेच्या माध्यमातून महिलांना गिरणी, वॉशिंग मशीनचे आमिष